Breaking News

हीन पातळी


लोकसभेच्या निवडणुकीत देशाच्या प्रश्‍नांची, धोरणांची चर्चा व्हायला हवी. देशाला कोण कोणत्या दिशेने घेऊन जाणार आहे, याची चर्चा व्हायला हवी. कोणत्या पक्षाची बेरोजगारी, शेती, उद्योग, अर्थकारणाबाबत काय धोरणे आहेत, त्यावर प्रतिवाद व्हायला हवा; परंतु सध्या लोकसभेच्या निवडणुकीत जे आरोप-प्रत्याराोप आणि व्यक्तिगत निंदानालस्ती चालू आहे, ते पाहिले, तर खरेच आपली लोकशाही प्रगल्भ झाली आहे का, असा प्रश्‍न पडावा, अशी स्थिती आहे. आतापर्यंत झालेल्या लोकसभेच्या 17 निवडणुकांत कधी इतकी हीनतेची पातळी गाठली गेली नव्हती. पंडित नेहरू यांनी लोकसभेच्या निवडणुकीत कधीही विरोधकांचे नाव घेतले नव्हते. 

यशवंतराव चव्हाण यांनी विरोधकांचा कधीच दुस्वास केला नाही. उलट, सत्ताधारी व विरोधक प्रचारात पक्षीय ध्येयधोरणांवर बोलायचे. त्यांच्यात वैयक्तिक शत्रूत्त्व कधीच नव्हते. परस्परांत मैत्री असायची. आता परिस्थिती एकदम उलटी झाली आहे. लोकशाही व्यवस्थेत सत्ताधारी व विरोधकांचे स्थान कधीही बदलत असते. कोणताही पक्ष कायमस्वरुपी सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नसतो. त्यामुळे आज विरोधात असलेले उद्या सत्तेत येऊ शकतात आणि आज सत्तेत असलेले उद्या विरोधात बसू शकतात. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांत खरेतर कटुता यायचे काहीच कारण नाही; परंतु तेवढे भान आता सत्ताधारी आणि विरोधकांना राहिलेले नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप-काँग्रेस नेत्यांमधे तुंबळ वाक्युद्ध पाहायला मिळाले आहे. समाजाच्या विविध स्तरांतून त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच
नेते मात्र त्यातून बोध घ्यायला तयार नाहीत. निवडणुकीचे पाच टप्पे संपले आहेत आणि सहावा टप्पा उद्या संपणार असतानाही नेत्यांच्या जिव्हा सैल सुटल्या आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच मर्यादा ओलांडल्याने इतरांनी त्यांच्यावर टीका करतानाही पातळी ओलांडली. त्यामुळे दोष कोणाला द्यायचा, हा प्रश्‍न उरतो. ज्येष्ठांनी मर्यादाभंग केल्यानंतर तरुण बहकणारच. आदर्श घालून देण्याची जबाबदारी असलेले बिनदिक्कत खोटे बोलून दिशाभूल करायला लागल्यानंतर ज्यांच्याकडून वैचारिकतेची अजिबात अपेक्षा नाही, त्या राबडी देवी, संजय निरुपम, गिरीराज सिंह, साक्षी महाराज यांनी चांगले बोलावे, असे गृहीत धरताच येत नाही. 

मोदी यांना ‘दुर्योधन’ संबोधणार्‍या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वधेरा यांच्यापुढे जात बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी मोदी यांची ‘जल्लाद’ अशी संभावना केली; तर, ’मोदी हे आधुनिक काळातील औरंगजेब आहेत’, असा उल्लेख काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला. लालूप्रसाद यादव यांनी यापूर्वी मोदी यांना जल्लाद हेच शेलके विशेषण वापरले होते. अर्थात या नेत्यांना कोणीही गांभीर्याने घेतलेले नाही. मोदी, सोनिया गांधी, शरद पवार यांच्यासारख्यांना गांभीर्याने घेतले जाते; परंतु त्यांंनीही पातळी सोडली. सोनिया या वेळी कुठेच प्रचारात नव्हत्या. पूर्वी त्यांनी मोदी यांची संभावना ‘मौत का सौदागर’अशी केलीच होती. राबडीदेवी यांनी मोदी यांच्यावर तोंडसुख घेताना, ‘पंतप्रधान मोदींना दुर्योधन म्हणून प्रियंका यांनी चूक केली आहे. त्यांना तर जल्लादच म्हणायला हवे. न्यायाधीश, पत्रकारांना मारण्याचे, त्यांचे उपहरण करण्याची कृत्ये केली जात आहेत. अशा व्यक्तीचे मन आणि विचार विखारीच असतील असे वाटते’, असे राबडीदेवी म्हणाल्या. एकीकडे राबडीदेवी मोदा यांना ‘जल्लाद’ म्हणत असतानाच निरुपम यांनी मोदी यांचा उल्लेख ‘आधुनिक काळातील औरंगजेब’, असा केला. ‘काशी विश्‍वनाथ कॉरिडॉर उभारण्याच्या नावाखाली वाराणसीतील शेकडो मंदिरे पाडण्यात आली आहेत. मोदी यांच्या आदेशांवरून ते करण्यात आले आहे. विश्‍वनाथ मंदिरात दर्शन घेण्यासाठी मोदी यांच्या सांगण्यावरूनच 550 रुपयांचे शुल्कही आकारले जात आहे. जे औरंगजेबाने केले नाही, ते मोदी यांनी करून दाखवले आहे’, असे असे निरुपम म्हणाले. 

निरुपम यांच्या टीकेला भाजपनेही प्रत्युत्तर दिले. ‘भारतावर आक्रमण करणार्‍यांनी केलेल्या तथाकथित कार्याचा राजकीय स्वार्थासाठी वापर करण्याची काँग्रेसची परंपराच आहे. त्यांना भारतीयांनी केलेली किंवा करत असलेली कामे दिसत नाहीत. मोदी यांनी सुरू केलेल्या विकासकामांवर टीका करण्यापूर्वी यूपीए सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून प्रभू रामचंद्रांचे अस्तित्वच का नाकारले आणि भारत-श्रीलंकादरम्यानचा रामसेतू नष्ट करण्याची मागणी का केली होती, याचा खुलासा काँग्रेसने करावा’, असे भाजपचे प्रवक्ते नलीन कोहली म्हणाले. विकासकामे सांगण्यासारखी नसली, की असे मुद्दे येतात.

आपल्यावर खालच्या पातळीवरून टीका होत असल्याचा दावा करत मोदी यांनी आपल्याविरोधात विरोधकांकडून वापरल्या जात असलेल्या अनुचित शब्दांची यादीच वाचून दाखवली. काँग्रेस त्यांच्याकडील ‘प्रेमाच्या शब्दकोषा’तील शब्द वापरून आपल्यावर ही चिखलफेक करत असल्याचा टोलाही त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव न घेता लगावला. गंदी नाली का किडा, पागल कुत्ता, भस्मासूर, माकड अशी विशेषणे काँग्रेसच्या नेत्यांनी मला लावली. एका नेत्याने तर माझी तुलना दाऊद इब्राहीमशी केली. माझे वडील कोण, अशी विचारणा करत त्यांनी माझ्या आईचाही अपमान केला, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस नेते चेहर्‍यावर प्रेमाचा मुखवटा चढवून मला शिवीगाळ करत आहेत, अशी टीका त्यांनी केली; परंतु गेलेल्या व्यक्तीवर खोटेनाटे आरोप करू नयेत, एवढे भान त्यांनाही राहिले नाही. राजीव गांधी यांचा बळी जाऊन आता दीड तप उलटले आहे, तरी त्यांच्या नावावर निवडणूक लढविण्याचे आव्हान देऊन मोदी काय साध्य करू पाहतात, हा प्रश्‍न उरतो. राहुल, प्रियंका, सोनिया, वधेरा यांच्यावर टीका, आरोप करणे एकवेळ समजू शकते; परंतु ज्या राजीव गांधी यांच्याविरोधातील एकही आरोप सिद्ध झालेला नाही, त्यांच्याविरोधात आता वेगवेगळे आरोप करून मोदी स्वतःही मर्यादाभंग करीत आहेत. लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा जवळ येत असतानाच राजकीय नेत्यांची जीभ चांगलीच घसरत चालली आहे. आपण काय बोलतोय, याचेही भान नेतेमंडळींना राहिलेले नाही. दुसर्‍यांवर टीका करण्याच्या नादात चिखलफेक केली जात आहे. 

आपल्या देशातील राजकीय पक्ष आता आपापल्या विरोधकांना प्रतिस्पर्धी नाही, तर शत्रू मानू लागले आहेत. हीच लोकशाहीसाठी मोठी धोक्याची घंटा आहे. सद्य:स्थितीतील प्रचार हा विकासाच्या मुद्यावर न होता व्यक्तीद्वेष, जातीय द्वेषभावनेकडे वळला आहे. निवडणुकीतील यशाची शाश्‍वती नसल्याने पुन्हा सत्ता येण्यासाठी अशी मंडळी वाट्टेल ते करतात. सर्वसामान्यांच्या विकासाला प्राधान्य देण्याऐवजी लोकांना नव्या, कल्पित विचारांकडे घेऊन जाणे म्हणजे लोकांची फसवणूक आहे. देशाच्या राजकारणातील घटनात्मक पदावरील व्यक्तीची ही सर्वात मोठी घसरण मानावी लागेल. राजीव गांधी यांच्यासंदर्भातील मोदी यांची भाषा ऐकल्यानंतर मरण पावलेल्या माणसांबद्दल किती विकृतपणे विचार केला जातो याची कल्पना येते. प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी जेवढी हीन पातळी गाठली नाही तेवढी राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनी गाठली आहे हे या देशाचे दुर्दैव आहे. व्यक्तीचा मृत्यू झाला म्हणजे त्याच्याशी वैर संपले असे हिंदू धर्मात मानले जाते.