Breaking News

हा तर भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस


निवडणूक आयोगावर काँग्रेसची टीका; संविधानाचा दुरुपयोग केल्याचा आरोप
नवीदिल्लीः मंगळवारी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने पश्‍चिम बंगालमध्ये गुरुवार रात्रीपासून प्रचारबंदी लागू केली आहे. या निर्णयावर बसपच्या अध्यक्ष मायावती आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांच्यापाठोपाठ आता काँग्रेसनेही हरकत घेतली आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक संहितेच्या कलम 14 आणि 21चे उल्लंघन केले असून 16 मे हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस ठरला आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.
कोलकाता येथे भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी प्रचंड हिंसाचार केला. या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या एक दिवस आधीच गुरुवार रात्रीपासून प्रचारबंदीचा लागू करण्याचे निर्देश दिले; पण गुरुवारी मोदी यांची लक्ष्मीकांतपूर आणि दमदम येथे सभा असल्यामुळे गुरुवार सकाळऐवजी रात्रीपासून प्रचारबंदी करण्याचा निर्णय घेतला गेला असल्याची टीका केली जात आहे. ममता आणि मायावती यांनी याप्रकरणी टीका केल्यानंतर आता काँग्रेसनेही निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.
 निवडणूक आयोगाने संविधानाच्या कलम 324चा गैरवापर केला आहे. कोणत्याही स्वतंत्र लोकशाहीत अशाप्रकारचा पक्षपातीपणा करणे स्वीकारार्ह नाही. हा भारतीय लोकशाहीतील काळा दिवस आहे, ’ असा आरोप सुरजेवाला यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत केला आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक संहितेच्या कलम 14 आणि 21 चे उल्लंघन केले आहे. तसेच सर्वांना समान संधी देण्याचा संविधानिक अधिकारही काढून घेतला आहे हे अन्याय्य आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली आहे.


निवडणूक आयोग पक्षपाती

यावर्षी काँग्रेसने नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याच्या 11 तक्रारी दाखल केल्या होत्या. शाह यांनी उमेदवारांना धमकावल्याच्या तक्रारींचाही समावेश होता; पण निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली नाही. मोदी यांना सर्व प्रकरणांत ‘क्लीन चिट’ देण्यात आली. निवडणूक आयोगाच्या या पक्षपातीपणाचा सुरजेवालांनी चांगलाच समाचार घेतला.