Breaking News

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करणार -डॉ.तांबे


संगमनेर/प्रतिनिधी: राज्यातील अनुदानित शाळांमध्ये 21 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आपण कायम पाठपुरावा केला आहे. व यापुढे ही प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ.डॉ.सुधीर तांबे यांनी व्यक्त केला आहे.

संगमनेर येथे जुनी पेन्शन हक्क संघटनेचे तुषार शिंदे, बी.टी. मखरे, एस.एल.क्षिरसागर, डी.आर.खेडकर, एस.बी.गंजरे, एस.एस.भोर, डी.एस.दरेकर व पदाधिकार्‍यांनी आ.डॉ.सुधीर तांबे यांची भेट घेतली.
याप्रसंगी आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी राज्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित, अंशत अनुदानित व यासंबंधी तुकड्यावर नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, हा आग्रह आपण कायम ठेवला आहे. याबाबत आपण वेळोवेळी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून बैठका घेतल्या आहेत. शिक्षण आयुक्तांनाही अनेक वेळा निवेदने दिली आहेत. या पेन्शन योजनेेबाबत राज्यपाल महोदय यांची सर्व शिक्षक आमदारांची भेट घेतली आहे. त्या प्रत्येक वेळी शासनाने वेळ काढूपणाचे धोरण घेतले असून हा प्रश्‍न प्रलंबित ठेवला आहे. विना अनुदानित शाळांवर अनेक कर्मचारी खुप दिवस अत्यंत कमी पगारात काम करतात. व निवृत्ती नंतर ही त्यांना अत्यंत कमी पेन्शन मिळाली तर त्यांच्यावर मोठा अन्याय होणार आहे. म्हणून सर्व कर्मचार्‍यांना जुनीच पेन्शन योजना सुरु करणे अगदी न्याय ठरणार आहे. 

त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत कर्मचार्‍यांनी गोंधळून जाऊ नये. ही योजना लागू व्हावी, या संदर्भातील पुढील दिशा ठरविण्यासाठी मुंबई येथे 21 मे 2019 रोजी सर्व शिक्षक आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. तसेच जुनी पेन्शन योजनेसाठी ते नक्कीच प्रयत्न करतील असा ठाम विश्‍वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी शिक्षक संघटनांची विविध पदाधिकारी हजर होते.