Breaking News

‘आरएसएस’ने देखील मोदींची साथ सोडली मायावती यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा


लखनौ : बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाव बुडाली आहे आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने देखील पंतप्रधानांची साथ सोडली असल्याचा आरोप मायावती यांनी केला आहे. मंगळवारी मायावती यांनी ट्विट करत थेट नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे.

’मागील निवडणुकीत दिलेली आणि अपुरी राहिलेली आश्‍वासने आणि जनतेचे आंदोलन पाहून आरएसएसने आपल्या स्वयंसेवकांना निवडणुकीच्या कामाला लावलेले नाही. यामुळे मोदी त्रस्त आहेत. लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या भागात ’आर-या-पार’ अशी स्थिती आहे. पंतप्रधान मोदी घाबरले आहेत. आरएसएसने देखील त्यांची साथ सोडली आहे,’ अशा आशयाचे ट्विट मायावतींनी केले आहे. ’जनतेची दिशाभूल करण्यासाठी सेवक, मुख्य सेवक, चहावाला, चौकीदार अशा रूपात नेत्यांना दाखवण्यात आले. मात्र, आता देशाला संविधानाच्या मार्गावर चालणारा ’शुद्ध’ पंतप्रधान हवा आहे. आतापर्यंत बहुरुप्यांनी जनतेला फसविले आहे. आता जनता फसणार नाही,’ असे मायावतींनी म्हटले आहे. यानंतर उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी प्रियांका गांधींवरही निशाणा साधला. ’सध्या ’रोड शो’ घेणे आणि प्रत्येक ठिकाणी पूजा-पाठ करणे हीदेखील फॅशन बनली आहे. यामध्ये मोठा खर्च केला जातो. निवडणूक आयोगाने हा खर्च त्या-त्या मतदार संघातील त्या पक्षाच्या उमेदवाराच्या निवडणूक खर्चात मिळवावा. मायावती यांनी ’भाजपमधील नेत्यांच्या पत्नी या नेत्यांच्या मोदींशी असलेल्या संपर्कामुळे घाबरल्या आहेत,’ असे वक्तव्य सोमवारी केले होते. ’या महिलांना मोदींच्या संगतीमुळे आपला पती आपल्याला सोडून देईल,’ याची काळजी वाटत आहे, असे त्यांनी म्हटले होते. गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदी आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. सोमवारी गोरखपूरमधील एका सभेतही मायावतींनी मोदींवर टीका केली होती. शिव्या खायची कामं केली तर शिव्या पडणारच, असे मायावतींनी म्हटले होते. आपल्या पत्नीला राजकारणासाठी ज्यांनी सोडले ते इतर महिलांचा सन्मान कसा करणार? अशा शब्दांत त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला होता.

दुसर्‍या एका ट्विटमध्ये मायावती यांनी असे म्हटले आहे की, जनतेच्या लांगुलचालनासाठी काही नेत्यांनी सेवक, मुख्यसेवक, चहावाला आणि चौकीदार आदी रुपे धारण केलीत. आता देशाला कल्याणकारी स्वच्छ पंतप्रधान पाहिजे. जनतेने अशा दुहेरी चरित्र असलेल्यांकडून खूप फसवणूक झाली आहे. यापुढे त्यांची फसवणूक होणार नाही.