Breaking News

शेवगाव शहरात खुलेआम मावा विक्री


शेवगाव/प्रतिनिधी: शेवगाव शहरात खुलेआम टपरीवर मावा विक्री सुरू आहे. विक्रीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तर मावा विक्री करणार्‍या लोकांची दिवसेंदिवस दादागिरी वाढत चालली आहे. कारण बिनधास्तपणे शेवगाव शहरात मावा बनवला जातो. व मावा तयार करण्यासाठी सुगंधित सुपारी व मावा चांगल्या क्वॉलिटीचा व्हावा, यासाठी चक्क गांजाचे पाणी मिसळवले जाते. कारण माव्याचा जास्त खप व्हावा, म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या जातात. पण या सगळ्या गोष्टी नागरिकांच्या आरोग्याशी छेळ करणार्‍या आहेत.

हा मावा शेवगाव शहरात क्रांती चौक, आंबेडकर चौक, याठिकाणी सगळ्यात जास्त प्रमाणात विक्री केला जातो. क्रांती चौक हा बस स्टँड समोरील चौक आहे. याठिकाणी अनेक अनधिकृत टपर्‍याच्या माध्यमातून मावा विक्री केला जातो. व या टपर्‍या अतिक्रमण करून या ठिकाणी वसलेल्या आहेत. यांना कोणत्याही प्रकारचे शॉप लायसन नाही. याकडे शेवगाव नगर पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांचा हलगर्जीपणा होत आहे. 

या मावा विक्री करणार्‍या टपर्‍याधारका विषयी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. बस स्टँड समोरील क्रांती चौक हा अतिशय वर्दळीचा चौक असून याठिकाणी ट्रक, ट्रॅक्टर, आईसर, कंटेनर, डंपर, इतकी जड वाहने मावा घेण्यासाठी भर चौकात गाडी उभी करतात. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. व याकडे शेवगाव पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालेले दिसते. कोणत्याही मावा घेणार्‍या गाडीवाल्यांना शेवगाव शहर ट्राफिक पोलिस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत नाही. व आंबेडकर चौक हा ही अतिशय महत्त्वाचा चौक असल्याकारणाने याठिकाणी सुद्धा टपरीधारक अतिक्रमण करून मावा विक्री करतात. मावा विक्रीची शिकार शाळेत जाणारी मुले, डेली ये-जा करणारे वाहतूक, आंबेडकर चौकात अनेक प्रकारच्या हॉस्पिटल्स आहेत. या ठिकाणी येणारे रुग्णांचे नातेवाईक सुद्धा मावा खाऊन हॉस्पिटलचा परिसर अस्वच्छ करतात व त्या माध्यमातून दुर्गंधी सुटते.
शेवगाव शहरात ज्या ठिकाणी मावा हा मोठ्या प्रमाणात बनवला जातो. त्याठिकाणी अधिकृत जागा व अधिकृत वीज कोणत्याही प्रकारची नाही. याकडे वीज बोर्डाचे शहर प्रतिनिधी तायडे यांचे दुर्लक्ष दिसून येत आहे. कोणत्याही प्रकारचे प्रॉडक्ट लायसन नाही. या सर्व प्रकारांकडे अन्नभेसळ विभाग यांची कारवाई एका वर्षात दिसून आलेले नाही. शेवगाव शहरात मानवाच्या आरोग्याशी खेळणार्‍या या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष सर्वच विभागाचे दिसत आहे.

मोटरसायकल वरून मावा सप्लाय 

हा मावा फक्त शेवगाव शहरातच नाही, तर शेवगाव तालुक्यातील दहिगाव, शहरटाकळी, भातकूडगाव फाटा, ढोरजळगाव, अमरापूर, आखेगाव, बोधेगाव, बालमटाकळी, चापडगाव, हातगाव, घोटण इत्यादी गावामध्ये हा तयार मावा मोटरसायकल वरून सप्लाय केला जातो.

मागील वर्षी मावा विक्री करणार्‍या विरोधात आम्ही गुन्हे दाखल केले होते. व लवकरच या मावा विक्री करणार्‍या विरोधात ठोस कारवाई केली जाईल. - उमेश सूर्यवंशी अन्नभेसळ विभाग शेवगाव
मावा खाल्ल्याने तोंडाचे कॅन्सर होणे, दांपत्य न होणे अशा प्रकारचे अनेक अनेक आजार मावा खाणार्‍या व्यक्ती मध्ये जडतात तर मावा सहज उपलब्ध होत असल्याने माव्याचे शिकार शाळेत जाणारे अल्पवयीन विद्यार्थी ठरत आहे.
- डॉ. नीरज लांडे-शेवगाव
मावा विक्री करणार्‍या विरोधात प्रशासन अर्थपूर्ण तडजोड करून त्यांच्याकडे कानाडोळा करत आहे. मावा विक्री करणार्‍या विरोधात जर लवकरच कारवाई करण्यात आली नाही तर मोठ्या स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल.
- अविनाश मगरे, तालुका प्रमुख शिवसेना