Breaking News

केरळमध्ये मान्सूनचे आगमन उशिराने‘स्कायमेट’चा अंदाज


मुंबई : राज्यात दुष्काळाची छाया गडद असतांनाच, केरळमध्ये मान्सूनचे आगमन उशीरा होणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरिस केरळमध्ये मान्सून दाखल होतो. परंतु यावेळी केरळमध्येही 4 जून रोजी मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्कायमेटच्या अंदाजामुळे पुन्हा एकदा शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच पडली आहे. देशभरात असलेला उकाडा, आणि अनेक राज्यात पाणी आणि चाराटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी पाऊस लवकर पडावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा. मात्र स्कायमेटच्या अंदाजामुळे केरळमध्ये मान्सूनचे आगमन उशीरा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात कमी पाऊस पडेल अशी शक्यताही स्कायमेटने वर्तवली आहे.

भारतातील जवळपास 70 टक्के शेती मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे स्कायमेटच्या नव्या अंदाजाने शेतकर्‍यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा हे भाग आताच दुष्काळाच्या झळांनी होरपळत आहेत. त्यामध्ये आता सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यास येथील दुष्काळाची तीव्रता आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. मुंबईतही मान्सून नेहमीपेक्षा उशीरानेच दाखल होण्याची चिन्हे आहेत. एरवी 8 ते 10 जूनच्या दरम्यान मान्सून मुंबईत दाखल होतो. मात्र, यंदा मान्सूनचे आगमन 15 ते 18 जून, कदाचित 20 जूनपर्यंतही लांबण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी 9 जूनला मान्सून मुंबईत दाखल झाला होता, असे स्कायमेटच्या पत्रकात म्हटले आहे. यंदा देशभरात मान्सूनची वाटचाल संथ राहील. 

काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल. पूर्व, ईशान्य आणि मध्य भारताच्या काही भागात देशातील इतर भागांच्या तुलनेत पर्जन्यमान अत्यंत कमी असण्याची शक्यता स्कायमेटच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यावर्षी देशातील मान्सून अल निनोच्या प्रभावाखाली राहणार असल्याचे मतही स्कायमेटने व्यक्त केले आहे. तसेच जुलै महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आली आहे. तसेच देशभरात सरासरीच्या 93 टक्के पाऊस पडेल, या अंदाजावर स्कायमेट ठाम आहे. तसेच बिहार, झारखंड आणि पश्‍चिम बंगालमध्ये यावेळी कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आले.

मान्सून 4 जून रोजी केरळमध्ये 

नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून 4 जून रोजी केरळमध्ये दाखल होईल. मात्र, त्यापुढे मान्सूच्या देशभरातील वाटचालीत अडथळे येतील. त्यामुळे मुंबईसह राज्यभरात मान्सून उशीराने दाखल होईल, असा अंदाज ’स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. यापूर्वी स्कायमेटने राज्यात सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. मात्र, आता स्कायमेटच्या नव्या अंदाजानुसार मान्सूनचे महाराष्ट्रातील आगमन लांबणार आहे. तसेच दुष्काळग्रस्त विदर्भ आणि मराठवाड्यात पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी असेल, असेही स्कायमेटने म्हटले आहे. त्यामुळे दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाडा आणि विदर्भवासियांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे.