Breaking News

साध्वींना कदापि माफी नाही; पंतप्रधान मोदींचा पवित्रानिवडणूक आयोगाची नोटीस, तर न्यायालयाचा दणका


Image result for पंतप्रधान


नवीदिल्ली, भोपाळ, मुंबई ः महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त म्हणवणारी भाजप उमेदवार साध्वी चांगलीच अडचणीत आली आहे. आता पक्षाच्या या डॅमेज कंट्रोलसाठी खुद्द खुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी सरसावले आहेत. प्रज्ञा यांनी भलेही माफी मागितली असेल; पण मी मनापासून त्यांना कधीही माफ करणार नाही, अशा तीव्र शब्दात मोदी यांनी प्रज्ञासिंहवर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने प्रज्ञासिंह यांना नोटीस बजावली आहे, तर मालेगाव बाँबस्फोटप्रकरणी त्यांना आठवड्यातून एक दिवस न्यायालयात हजेरी लावावी लागणार आहे.
मोदी म्हणाले, की गांधीजींबाबत जी विधाने बोलली जात आहेत ती वाईट, घृणास्पद आहेत. सभ्य भाषेत अशी वक्तव्ये केली जात नाहीत. असे बोलणार्‍याला 100 वेळा विचार करावा लागेल. त्यांनी माफी मागितली असेल तरी मी मनापासून त्यांना कधीही माफ करणार नाही. तत्पूर्वी, भाजपने नथुराम गोडसेंबाबत वक्तव्य करणार्‍या साध्वी प्रज्ञा, नलीन काटील आणि अनंतकुमार हेगडेंची निवेदने पक्षाच्या अनुशासन समितीकडे पाठवली आहेत.
मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींना आठवड्यातून एकदा कोर्ट रुममध्ये हजर राहण्याचे आदेश एनआयए कोर्टाने दिले आहेत. आरोपी कोर्टात हजर राहत नसल्याबद्दल कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल पुरोहित आदी आरोपी आहेत.
एनआयए कोर्टात सध्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी 20 मे रोजी होणार आहे. सुनावणी दरम्यान आरोपी वारंवार अनुपस्थित असल्यामुळे कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणातील आरोपींनी आठवड्यातून एकदा सुनवाणी दरम्यान हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये आरोपी लेफ्टनंट पुरोहित यांची आरोप निश्‍चित करण्यावर स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळून लावली होती, तर मालेगाव स्फोट प्रकरणाची चौकशी एसआयटीकडून करून घेण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने सुनावणी घेण्यास नकार देत सुनावणी होत असलेल्या कोर्टात अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले होते. साध्वी प्रज्ञासिंह यांनी माफी मागितली असली, तरी हा वाद एवढ्यावरच संपण्याची चिन्हे नाहीत. कारण साध्वीच्या वादग्रस्त विधानाची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांकडून आयोगाने याबाबतचा अहवाल मागवला आहे.