Breaking News

दुष्काळामुळे गोशाळा चालक अडचणीतअकोले/प्रतिनिधी
अकोले तालुक्यात पावसाचे प्रमाण नेहमी जास्त असते. परंतु यावर्षी झालेल्या अत्यंत पावसाने प्रचंड दुष्काळाचा सामना करण्याची वेळ शेतकऱ्यांबरोबर गोशाळा चालकांवर आली आहे. चारा पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याने शेतकरी आपले पशुधन गोशाळेत दाखल करू लागले आहेत. मात्र चारा पाण्याच्या संकटामुळे एवढ्या या जनावरांची तहान व भूक भागवायची कशी? या प्रश्नामुळे गोशाळा चालकही हवालदिल झाले आहेत.

अकोले तालुक्यात विरगांव,पांगरी,पिंपळगांव खांड,पिंपळदरी आणि आगर याठिकाणी गोशाळा आहेत. मात्र यावर्षीचा कडक उन्हाळ्यात या गोशाळांचे चारा पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. पाण्याचे स्रोतच आटल्याने गोशाळेच्या पाण्याच्या टाक्याही कोरड्या ठाक झाल्या आहेत. शेतकरी चारा पाण्या अभावी आपली जनावरे गोशाळेत दाखल करत आहेत. मात्र गोशाळेतच पाणी व चारा टंचाई निर्माण झाल्याने गोशाळा चालक चिंतेच्या सावटाखाली आहेत. तरीही काही सामाजिक संस्था यासाठी मदत करत आहेत. काही लोक सामाजिक बांधिलकी ठेवून पाण्याचे टँकर देत आहेत मात्र एवढ्या जनावरांची तहान भागवायची कशी हे गणित गोशाळा चालकांना जुळणे अवघड होवून बसले आहे. शंभर गाईंना रोज सरासरी दीड ते दोन टन चारा व दोन हजार लिटर पाणी लागते. यावर्षी चारा पाण्याचे संकट उभे राहिल्याने पशुधन वाचवण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे.