Breaking News

अग्रलेख साध्वी नव्हे वादवी!साधू, संत समाजाला दिशा देतात. चांगली शिकवण देतात. समाजात एकी व्हावी, बेकी दूर व्हावी, असा त्यांचा प्रयत्न असतो; परंतु समाजात सध्या वावरणार्‍या कथितांना साधू, संत म्हणावे का, असा प्रश्‍न पडावा, अशी स्थिती आहे. जिभेवर साखर असली, की गोडवा आपोआप येतो; परंतु ज्यांच्या बोलण्यात कायम कारल्याचे गुण असतात, त्यांना साधू, साध्वी म्हणावे का? साध्वींनीही आपल्या आचरणातून समाजापुढे आदर्श ठेवायचा असतो; परंतु ज्यांच्या आचरणातून सामाजिक दुभंगलेपणाला खतपाणी घालण्याचे काम सातत्याने होते, त्यांच्या ठायी साधूत्वाची लक्षणे कशी असतील? मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन मुंबईकरांचे रक्षण केले, देशाप्रती समर्पित भाव व्यक्त केला, त्या हेमंत करकरे यांना देशद्रोही ठरवायला निघालेल्यांकडून आणखी काय अपेक्षा करायची? साध्वी प्रज्ञासिंह यांच्या नावात प्रज्ञा असले, तरी त्यांच्या वागण्यात कुठेही प्रज्ञा दिसली नाही. त्यांच्यावरचे आरोप बाजूला ठेवले, तरी त्या ज्या पद्धतीने वादग्रस्त विधाने करीत आहेत आणि भाजपने वारंवार त्यांच्या विधानांपासून स्वतःला दूर ठेवले असले, तरी त्याचा अंतिमतः फटका भाजपलाच बसणार आहे. साध्वींना जोपर्यंत भाजपने उमेदवारी दिली नव्हती, तोपर्यंत त्यांनी कितीही बाष्कळ विधाने केली, तरी त्याची जबाबदारी भाजपवर येत नव्हती; परंतु भोपाळमधून  भाजपने साध्वींना उमेदवारी दिल्यानंतर त्या भाजपच्या घटक झाल्या. उमेदवारी मिळाल्यानंतर साध्वींना निवडणूक आयोग आणि जनता दोन्हींची माफी मागण्याची वारंवार संधी मिळायला लागली आहे! मायबाप जनतेसमोर माथा टेकवण्यात कसली लाज असे समर्थनही केले जाऊ शकते. माथा टेकवणे आणि शरणागती यात फरक आहे, हे भाजप आणि साध्वींच्या लक्षात यायला हवे. वास्तविक प्रत्येक गोष्टीत प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असे काही नसते. मौनात सामर्थ्य दडलेले असते; परंतु साध्वी म्हणविणार्‍या प्रज्ञासिंह यांना साधूत्वाचे हे लक्षणच माहीत नसावे. बारा-बारा वर्षे मौन धारण करून तपश्‍चर्या करणारे साधू कोठे आणि वारंवार वादग्रस्त विधाने करून आपल्याच जिव्हेला अडचणीत आणणार्‍या साध्वी कोठे, असा प्रश्‍न समाजमनालाही पडू शकतो.

हेमंत करकरे यांच्याबाबतच्या विधानांमुळे प्रचारापासून काही काळ दूर राहाव्या लागलेल्या साध्वींना त्यानंतर तरी समज आली असेल, असे वाटले होते. साध्वींच्या मतदारसंघातील निवडणूक आता पार पडली असली, तरी मध्य प्रदेशातील मंदसौर-इंदू पट्टयातील निवडणूक रविवारी व्हायची आहे. त्यामुळे आपल्या विधानांनी पक्षाची अडचण होऊ नये, अशी दखल त्यांनी घ्यायला हवी होती. कमल हासन यांनी नथुराम गोडसे हा देशातील पहिले हिंदू दहशतवादी होता, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या विधानांची चौकशी चालू आहे. त्यांना अंडी, चप्पलांचा मारा सहन करावा लागतो आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रज्ञासिंह यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी कमल हासन यांची विधाने चुकीची आहेत, त्यांच्यावर कारवाईची मागणी करून मोकळे व्हायचे, तर त्यांनी नधुराम गोडसे हा देशभक्त होता, असे प्रशस्तिपत्रक देऊन टाकले. नथुराम गोडसे हा महात्मा गांधी यांचा खुनी आहे. त्याच्या कृत्याचे समर्थदहशतवादी होता, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या विधानांची चौकशी चालू आहे. त्यांना अंडी, चप्पलांचा मारा सहन करावा लागतो आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रज्ञासिंह यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी कमल हासन यांची विधाने चुकीची आहेत, त्यांच्यावर कारवाईची मागणी करून मोकळे व्हायचे, तर त्यांनी नधुराम गोडसे हा देशभक्त होता, असे प्रशस्तिपत्रक देऊन टाकले. नथुराम गोडसे हा महात्मा गांधी यांचा खुनी आहे. त्याच्या कृत्याचे समर्थन कुणी करू शकत नाही; परंतु गोडसेला देशभक्तीचे प्रमाणपत्र देताना त्याच्या कृत्याचे उदात्तीकरण करता कामा नये, एवढे भान त्यांनी ठेवायला हवे. गोडसेला देशभक्त ठरवण्याच्या ओघात मग महात्मा गांधी देशद्रोही होते का, असा प्रश्‍न निर्माण होतो.

साध्वींच्या वादग्रस्त विधानाची किंमत मोजावी लागेल, असे लक्षात आल्यानंतर भाजपने त्यांच्या विधानांपासून फारकत तर घेतलीच; शिवाय त्यांना माफी मागायला लावली. साध्वींनी माफी मागितली असली, तरी हा वाद एवढ्यावरच संपण्याची चिन्हे नाहीत. कारण साध्वीच्या वादग्रस्त विधानाची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांकडून आयोगाने याबाबतचा अहवाल मागवला आहे. निवडणूक आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले, की साध्वी प्रज्ञाच्या कथित वक्तव्याबाबत मध्य प्रदेशच्या सीईओंना अहवाल देण्यात सांगण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रज्ञाने राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी अपमानास्पद वक्तव्य केले आहे, ज्यामुळे निवडणुकांदरम्यान अशांतता पसरू शकते, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. साध्वी प्रज्ञाविरोधात कारवाईची देखील शिफारस करण्यात आल्याचे समजते. साध्वींच्या वक्तव्यानंतर देशभर साध्वी व भाजपवर टीकेचे आसूड उठताच पक्षाने त्यांच्या विधानाशी असहमती दर्शवली. ‘भाजप त्यांच्या विधानाशी सहमत नाही. या मताचा भाजप तीव्र निषेध करतो. त्यांनी या वादग्रस्त विधानाबद्दल जाहीर माफी मागावी’, असे भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव म्हणाले. त्यानंतर साध्वींचे प्रवक्ते व भाजप नेते हितेश वाजपेयी यांनी, ‘प्रज्ञासिंह यांनी माफी मागितली असून, आपले विधान मागे घेतले आहे’, असे स्पष्टीकरण दिले. पक्षाची भूमिका, तीच माझी भूमिका असल्याचे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले असून, माफीचा सूर आळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये जरादेखील विवेक असेल, तर त्यांनी प्रज्ञा ठाकूर यांना शिक्षा करून देशाची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली. नथुराम गोडसेला देशभक्त आणि हुतात्मा हेमंत करकरे यांना देशद्रोही म्हणविणार्‍या भाजपच्या डीएनएमध्ये हिंसेची संस्कृती आणि हुतात्म्यांचा अपमान असल्याची टीका काँग्रेसने केली. प्रज्ञा ठाकूर यांच्या विधानामुळे भाजपचा खरा आणि हिंसक चेहरा उघड झाला. भाजपने आपल्या नेत्यांच्या माध्यमातून गांधीवादी सिद्धांतांचा तिरस्कार करण्याचे षड्यंत्र चालविले आहे. या अक्षम्य गुन्ह्याला देश कधी माफ करू शकत नाही. करकरेंना देशद्रोही म्हटल्यानंतर मोदी यांनी प्रज्ञा ठाकूरचा बचाव केला,’ याचेही स्मरण काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी करून दिले. आताही साध्वींनी माफी मागितल्यानंतरही हा वाद मिटला नाही. केंद्रातील मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांनी माफी मागण्याची आवश्यकता नाही, असे म्हटले आहे. नथुराम गोडसेला खरा देशभक्त म्हणण्याचे धाडस कुणीतरी दाखवायला हवे होते, ते साध्वींनी दाखविले, असे त्यांनी म्हटले आहे. भाजपची मंडळी किती तोंडांनी बोलतात आणि आपल्या बोलण्यातून कसा मुद्दाम संभ्रम निर्माण करतात, हे यावरून लक्षात यायला हवे. याच हेगडे यांनी यापूर्वी संविधान बदलण्याची भाषा केली होती, तसेच दलितांना कुत्र्यांची उपमा दिली होती. अशा मंत्र्यांना मोदी आणि शाह पाठिशी घालतात, यावरून भाजपची कूटनीती लक्षात येते.