Breaking News

आयुक्त भालसिंग यांचा दीर्घ रजेचा अर्ज

अहमदनगर महानगरपालिक साठी इमेज परिणाम

अहमदनगर/प्रतिनिधी- अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग 20 मे पासून दीर्घ रजेवर जाण्याची शक्यता आहे. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे त्यांनी  नुकताच रजेसाठी अर्ज सादर  केला आहे.  
ठेकेदार संस्था ए.सी. कोठारी यांची 19 कामे रद्द तसेच महानगरपालिका कर्मचार्‍यावर निलंबन व बडतर्फची कारवाई आदी कारणांमुळे आयुक्त भालसिंग यांचा महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांनी धसका घेतला आहे. रजेचा अर्ज अंतिम मंजुरीसाठी नगरविकास विभागाकडे सादर करण्यात आला असून येत्या 20 तारखेपासून ते रजेवर जाण्याची शक्यता आहे. पूर्वीचे आयुक्त घनशाम मंगळे यांची बदली झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यांनी त्या काळात मनपा कर्मचार्‍यांना चांगलीच शिस्त लावून अनेक कामे मार्गी लावली. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
आता आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग हे औरंगाबाद येथून अहमदनगर नगरपालिकेत आयुक्त म्हणून आले आहेत. त्यांना येऊन पाच-सहा महिन्यांचा कालावधी झाला आहे. त्यांनीही त्यांच्या कामाची चुणूक नगरकरांना दाखवून देऊन कर्मचार्‍यांत चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. 
नगरमधील एक बडे प्रस्थ व एका लोेकप्रतिनिधीचा समर्थक असलेल्या ठेकेदाराची कामे रद्द करुन त्यांनी कायद्याचा हिसका दाखवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर दबाव आला असल्याचे अधिकारी व कर्मचार्‍यात बोलले जात आहे. आयुक्त भालसिंग मूळचे नगरचेच असल्याने त्यांना शहराच्या सर्व प्रश्‍नांची माहिती असल्याने व त्यांनी घेतलेल्या काही धाडसी निर्णयामुळे स्थानिक नेत्यांची नाराजी त्यांनी ओढून घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळेच त्यांनी रजेचा अर्ज सादर केला असण्याची चर्चा महानगरपालिका कर्मचार्‍यात सुरु आहे. ते रजेवर गेल्यावर कोणाकडे प्रभारी पदभार सोपविला जाईल याची कर्मचारी व नगरकरांना उत्सुकता आहे.