Breaking News

भाजप- शिवसेनेच्या चार आमदारांचे राजीनामे मंजूर

भाजप- शिवसेनेच साठी इमेज परिणाम

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीआधी वेगवेगळ्या कारणास्तव राजीनामे देणार्‍या 4 आमदारांचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शुक्रवारी मंजूर केले. भाजपाचे धुळ्याचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांच्यासह शिवसेनेचे सुरेश धानोरकर, प्रताप पाटील चिखलीकर, आणि हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामे देणार्‍यात समावेश आहे.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत बंडखोरी करणारे आमदार अनिल गोटे यांची भाजपामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राजीनामा देत असल्याचे सांगितले होते. वरोरा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार सुरेश बाळू धानोरकर यांनी भाजपात अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे सांगत राजीनामा दिला होता. तर लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांना भाजपाने लोकसभेची उमेदवारी दिल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. नांदेडमधील लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे गेल्या वर्षीच भाजपच्या गोटात गेले होते. नांदेड महापालिका निवडणुकीदरम्यान त्यांनी भाजपचे नेतृत्त्व केले होते. आता भाजपने त्यांना नांदेडमधून लोकसभेला मैदानात उतरले होते. त्यांनीही आपला राजीनामा दिला होता. धुळ्यातील भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी पक्षाविरोधात बंड केल्यानंतर राजीनामा दिला होता. धुळे महापालिकेत गोटे यांनी स्वतंत्र पॅनेल उभे केले होते. गोटे यांनी भाजपचे उमेदवार सुभाष भामरे यांना पराभूत करण्यासाठी धुळे लोकसभा निवडणूक लढविली.विदर्भातील वरोरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार सुरेश (बाळू) धानोरकर यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. धानोरकर यांनी चंद्रपूरमधून भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्याविरोधात निवडणूक लढविली आहे. वरील चारही आमदारांचे वेगवेगळ्या कारणाने दिलेले राजीनामा मंजूर केले आहेत.

विधान परिषदेच्या एका जागेसाठी 7 जूनला मतदान
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी येत्या 7 जून रोजी निवडणूक होणार आहे. या जागेवर निवडून जाणा-या नव्या आमदाराला केवळ अकरा महिन्याचा कार्यकाळ मिळणार आहे. एप्रिल 2020 पर्यंत या सदस्याला कार्यकाळ मिळेल. शिवाजीराव देशमुख यांचे या वर्षी 14 जानेवारी रोजी निधन झाले. त्यामुळे रिक्त होत असेलल्या जागेवर पुढील महिन्यात निवडणूक होत आहे. भाजप- शिवसेना युतीकडे मोठे संख्याबळ असल्याने ही निवडणूक बिनविरोध होईल असा अंदाज आहे.