Breaking News

राज्यात 14 जूनपर्यंत सर्वत्र पावसाची शक्यता

मुंबई 
पाउसाबाबतच्या परंपरागत कल्पनेनुसार 7 जूनला मृग लागते आणि पावसाळा सुरू होतो. पण गेल्या काही वर्षात असे होत नाही. मृग लागल्यानंतर बरेच दिवस पावसाची वाट पहावी लागले. यावर्षीही तसेच होण्याचे लक्षण दिसत आहे. राज्यात सर्वत्र 14 जूनपर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याच्या अधिकार्‍यांनी वर्तवला आहे.
या अंदाजानुसार केरळात तसेच ईशान्येकडील काही राज्यांमध्ये शनिवारी येणारा पाऊस महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर काही ठिकाणी येण्यास 14 जून उजाडणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात यंदा पाऊस विलंबानेच येणार असून राज्यभर पाऊस जूनअखेरीपर्यंत पोहोचणार आहे. महाराष्ट्राच्या किनारी भागात 14 जूनच्या आसपास पाऊस आला तरी त्यापुढील आठवडयात त्याचा महाराष्ट्रात पुरेसा विस्तार होण्याची शक्यता नाही. नंतरच्या आठवडयात (21 ते 27 जून) या कालावधीत बंगालच्या उपसागरातून येणारा पाऊस विदर्भापर्यंत पोहचेल. मात्र पूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी जूनअखेर (28 जून ते 4 जुलै) पर्यंतचा वेळ लागेल. समुद्रावरच्या वार्‍यांच्या बदलांवर मान्सूनची वाटचाल अवलंबून असते. त्यातील बदलानुसार पाऊस पडण्याचा काळ ठरतो, असे हवामान विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. महाराष्ट्रात पावसाचे आगमन झाल्यानंतरच विस्तारित पाऊस अनुमानाच्या आधारे पेरण्या उशिरा करण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, त्यासाठी 14 जूनपर्यंत थांबावे लागेल, असेही सांगण्यात आले आहे. विभागीय हवामान केंद्र आणि मुंबई महापालिकेतर्फे घेतलेल्या संयुक्त कार्यशाळेत हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी विस्तारित पावसाचे अनुमान (एक्स्टेन्डेड रेन फोरकास्ट) या प्रणालीबद्दल माहिती देताना पावसाचे आगमन लांबण्याची शक्यता व्यक्त केली. विस्तारित पाऊस अनुमान या प्रक्रियेत प्रत्येक आठवडयात देशभरातील हवामानाचा वेध घेतला जातो. या अनुमानानुसार महाराष्ट्रातील जून महिन्याचे पावसाचे प्रमाण हे मर्यादितच राहणार असल्याची लक्षणं आहेत.