Breaking News

नाशिकमध्ये विश्वास नांगरे पाटलांना गुन्हेगारांचं थेट आव्हान?

नाशिक/ प्रतिनिधी
रामाची वनवास भुमी म्हणून अध्यात्मिक महत्व अधोरेखीत होत असलेल्या तसेच अनेक ऐतिहासीक सामाजिक राजकीय घटनांचा साक्षीदार  असलेल्या नाशिक महानगराला शाप आहे का? अशी शंका नाशिककर आपआपसात चर्चा करतांना कुजूबूजत आहेत.नाशिककरांच्या मनात ही शापाची भानगडबाज पाल वळवळ करण्यास कारणंही तसेच घडत आहेत.नाशिक जिल्हा आणि शहर प्राशासनात कर्तव्य बजावण्यासाठी रूजू होणारे अधिकारी या पुण्यनगरीत दाखल होण्यापुर्वी कितीही कर्तव्यतत्पर म्हणून नावारूपाला आलेले असले तरी नाशिकचा पदभार घेतला की त्यांची कर्तव्य आयुध बोथट होत असल्याचा अनुभव नाशिककर प्रत्येकवेळी घेत आहे.पोलीस प्रशासनापुरते बोलायचे झाले तर  अपवाद फक्त पोलीस आयुक्त विष्णूदेव मिश्रा,कुलवंत कुमार सरंगल आणि काही प्रमाणात पोलीस अधिक्षक आणि पोलीस आयुक्त म्हणूनही काम केलेले डाॕ.रविंद्रकुमार सिंगल.
सिंगल यांचे उत्तराधिकारी म्हणून दाखल झालेले पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात ओळख आहे.गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून नांगरे पाटलांची कारकिर्द महाराष्ट्राला अवगत आहे.म्हणूनच नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून नांगरे पाटील रूजू होत असल्याचे वृत्त माध्यमांवर झळकताच नाशिककरांना आकाश ठेंगणे  झाले होते.तथापी पुर्वाश्रमीचे नांगरे पाटील हेच विद्यमान पोलीस आयुक्त आहेत का? असा प्रश्न नाशिककर स्वतःलाच विचारू लागले आहेत.कारणही तसेच आहे.
शहरात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? असा प्रश्न पडण्याएवढी परिस्थिती निर्माण झाली आहे. गुंडांकडून गाड्यांची तोडफोड, चेन स्नॅचिंग या घटना रोजच्याच होऊन बसलेल्या असतानाच, आता थेट पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली आहे. त्यामुळे नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर नाशिककरांनी दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ करावा, अशी अपेक्षा नाशिककर करत आहेत.
नाशिक शहरात नेमकं काय चाललंय असा प्रश्न सध्या नाशिककरांना पडतो आहे. एकीकडे शहरांमध्ये गुन्ह्यांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे शहरातील गुंडांची मजल आता थेट पोलिस कर्मचाऱ्यांवर हात उचलण्यापर्यंत पोहचली आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील गुन्ह्यांचा आढावा घेतला, तर चोरी, घरफोडी, गाड्यांची तोडफोड, पोलिसांवरील हल्ले अशा घटना कधी नव्हे त्या शहरात घडत आहेत.
पोलीस मुख्यालयातील एटीम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न, नाशिक रोड परिसरात 6 गाड्यांची तोडफोड, पाथर्डी भागात 2 दुचाकी गाड्यांची जाळपोळ, पोलीस अधीक्षकांच्या बंगल्याच्या आवारातील चंदनाच्या झाडांची चोरी, पोलीस कर्मचाऱ्यांवर टोळक्याचा हल्ला अशा सलग घटना मागील काळात घडल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांची जरब राहिली नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. विशेष म्हणजे पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात काही पोलीस कर्मचारी गंभीर जखमीही झाले होते. मागील 2 दिवसात 4 चारचाकी गाड्या फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लुटल्याच्याही घटना घडल्या आहेत.
या सर्व घटना कमी होत्या म्हणून की काय आता थेट पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यातूनच चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यामुळे जेथे पोलिसच सुरक्षित नाहीत, तेथे नागरिकांची काय अवस्था अशी परिस्थिती तयार झाली आहे.
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नाशिकच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जोमात कारवाई सुरु केली. मात्र, गुन्हेगारांनी गुन्ह्यांच्या घटना वाढवत एक प्रकारे या घटनांच्या माध्यमातून थेट त्यांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नांगरे पाटील यांच्यासमोर ही गुन्हेगारी मोडीत काढण्याचे मोठे आव्हान आहे.

भेद मानसिकता कारणीभूत!
पोलीस आणि नागरीक एकाच समाजाचे घटक आहेत.माञ जेंव्हा कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा अमंलबजावणीच्या पातळीवर मोजला जातो तेंव्हा जनतेच्या संरक्षणाचा वसा घेतलेली पोलीस यंञणा उघडपणे पोलीसाची बाजू घेतात.पोलीसांची बाजू रास्त असेल तर बाजू घेणे स्वाभाविक आणि नैसर्गीकही आहे.तथापी जनता आणि पोलीस यांच्या संघर्षात पोलीस कायदा पायदळी तुडवित असल्याचे उघड्या डोळ्यांनी दिसत असूनही जनतेलाच वेठीस धरले जाते.नाशिकमध्ये सध्या हेच सुरूअसल्याची चर्चा आहे.दबक्या आवाजात सुरू असलेली  ही चर्चाच कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्तांवरील नाशिककरांचा विश्वास डळमळीत होण्यास निमित्त ठरत आहेत.कुणी दंडूक्याने डोक फोडतय,कुणी कायदा हातात घेऊन बेकायदेशीरपणे गुन्ह्याचा तपास हातात घेऊन संशयीताचे अपहरण करतो,कुणी वाहनचालकाच्या कानशिलात मारून कान फोडतो...नाना घटना.कारवाई शुन्य किंवा धुळफेक.
दुसर्या बाजूला रस्त्यावरील झाडांवर आदळून होणार्या अपघातांमध्ये नाशिककरांचे बळी जातात तेंव्हा पोलीस यंञणा मनपाला पञ देण्याचे सोपस्कार करीत नाही.लक्ष फक्त हेल्मेट सक्तीवर.त्याच झाडावर एखाद्या पोलीसाचे वाहन आदळले तर तात्काळ पञोपचार..नाशिककरांसोबत हा भेदभावच नाही का?