Breaking News

धालवडी- पिंपळवाडी रस्त्याला झुडपांचा विळखा

 खड्डे आणि विखुरलेल्या खडीने प्रवासी त्रस्त ; प्रशासन सुस्त

कर्जत/प्रतिनिधी
  कर्जत तालुक्यातील धालवडी- पिंपळवाडी दरम्यान तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खडी पसरली असून जागोजागी खड्डे पडले आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे दुचाकी वाहने चालविणे मुश्किल झाले आहे. उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
  धालवडीवरुन राशिनला जाण्यासाठी पिंपळवाडी मार्गे जावे लागते. मात्र, या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. रस्त्याच्या दुतर्फा काटेरी बाभळी वाढल्याने प्रवाशांना काट्यांचे फटकारे सहन करीत प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात चिखल होत असल्याने वाहने रस्त्यात अडकून पडत आहेत. पिंपळवाडी तसेच धालवडी या ग्रामपंचायतीने काही वर्षांपूर्वी आपल्या हद्दीतील रस्त्याचे रोजगार हमी योजनेतून मुरुमीकरण काम केल्याने त्यातून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, सध्या त्यांचीही दुरवस्था झाली आहे.
 धालवडी ते पिंपळवाडी दरम्यान सुमारे अर्धा किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे डांबरीकरण काम मोठ्या प्रतिक्षेनंतर पूर्ण झाले. मात्र, पुढील रस्त्याच्या कामाला किती प्रतिक्षा करावी लागते हा नागरिकांचा प्रश्‍न आहे. धालवडी तसेच परिसरातील लोकांना राशिन येथे आठवडे बाजारासाठी याच मार्गाने जावे लागते. त्यामुळे रस्ता पक्का नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. सर्व काम पूर्ण झालेले नसल्याने प्रवाशांचा खोळंबा होत आहे. रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी माजी सरपंच बापूराव सुपेकर यांनी केली आहे.