Breaking News

धनगर आरक्षणावरून विधान परिषदेत दुसर्‍या दिवशीही गदारोळ

 मुंबई
विधान परिषदेत शुक्रवारी सलग दुसर्‍या दिवशी प्रचंड गदारोळ झाला. विशेष म्हणजे विरोधी पक्षाबरोबरच सत्ताधारी पक्षानेही गदारोळ केल्यामुळे सभापती रामराजे निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. धनगर आरक्षणावरून गुरुवारी विरोधकांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत सभागृहाची माफी मागावी अशी मागणी सत्ताधार्‍यांनी आजही लावून धरली. त्यामुळे सभापतींना सभागृहाचे कामकाज सुरुवातीला दोन वेळा अर्ध्या तासासाठी आणि अखेरीस दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

    धनगर समाजाला आरक्षणही दिले जात नाही आणि त्यांच्या संदर्भातील अहवालही सरकार सभागृहासमोर आणत नाही असा आक्षेप विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घेतला, तर, भाई जगताप यांनी असंसदीय शब्द वापरल्याने ते माफी मागत नाहीत, तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी घेतली. यावेळी स्थगन प्रस्तावाद्वारे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संबंधित भ्रष्टाचाराचे प्रकरण उपस्थित करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला. मात्र सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांच्या गदारोळामुळे दोन वेळा कामकाज तहकूब करावे लागले. त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिल्यामुळे सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

  अखेर या गदारोळातच विनियोजन विधेयक मंजूर करण्यात आले. तसेच 2019-20 च्या पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मांडल्या. सभापतींनी सर्व कामकाज गदारोळातच रेटून नेले.