Breaking News

राहुल गांधी काँगे्रस अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम

एका कुटूंबाचा पक्ष या आरोपातून ‘काँग्रेस’ला करणार मुक्त
प्रियंका गांधी यांचे नाव सुचवू नये ; पक्षकार्यकारिणीला आदेश 


देशातील दुर्बल घटकांसाठी लढणार काँग्रेस 
सलग दुसर्‍यांदा केंद्रात एनडीएची सत्ता स्थापन झाली आहे. देशभरात काँग्रसला यंदाही मोठा पराभव पाहायला मिळाला. यंदाच्या लोकसभेत काँग्रेसची जी वाताहत झाली यावरून काँग्रेसकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोण बदलला असल्याचे सध्या चित्र आहे. मात्र, वेळ कितीही कठीण आली असली तरी काँग्रेस पक्ष नेहमीच देशातील दुर्बल घटकांसाठी लढणार. देशातील कमजोर घटकांना वाचविण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे.

नवी दिल्ली 
17 व्या लोकसभेत काँग्रेसचा झालेला पराभव काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. पराभवानंर लगेच राहुल यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाच्या समितीकडे दिला आहे. आणि आपण राजीनाम्यावर ठाम असल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले आहे. आणि माझ्या राजीनाम्यानंतर कोणीही लगेच प्रियंका गांधी यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचवू नये असे राहुल यांनी आधीच पक्षकार्यकारिणीला बजावले आहे. काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष गांधी घराण्याच्या बाहेरची व्यक्ती असावी असा अट्टाहास राहुल यांनी धरला आहे. म्हणजेच राहुल काँग्रेसला एका कुटुंबाचा पक्ष या आरोपातून मुक्त करु इच्छितात हे उघड आहे.
राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीकडे पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा कार्यकारिणीने अद्याप स्वीकारलेला नाही. त्याउलट काँग्रेस नेते आणि मित्रपरिवाराकडून राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती मिळाली आहे. राहुल गांधी राजीनामा मागे घेण्यास तयार नसल्यामुळे काँग्रेसकडून नव्या अध्यक्षपदासाठी चाचपणी केली जात आहे. पक्षातील अनेक वरिष्ठ नेते आणि नव्या दमाच्या नेत्यांचा विचार केला जात आहे. तसेच राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम राहीले तर काँग्रेसकडून एका कार्यकारी अध्यक्षाची नेमणूक केली जाऊ शकते. किंवा पक्ष चालवण्यासाठी चार ते पाच जणांची समिती नेमली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान तूर्तास हा विषय टळला आहे. बर्‍याच कालावधीनंतर पुन्हा काँग्रेसवर गांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष शोधण्याची वेळ आली आहे. काँग्रेसकडे पक्षाध्यक्षपदासाठी ए. के. अँटोनी, कॅप्टन अमरिंदर सिंह, अशोक गहलोत, मल्लिकार्जुन खरगे, सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे हे पर्याय आहेत.