Breaking News

सर्जेपुरात महापालिकेची अतिक्रमणांवर कारवाई

अहमदनगर/प्रतिनिधी
नेहमीच गजबजलेला असलेला सर्जेपुरा भाग हा महात्मा गांधी रोडवरील कापडबाजार, व्यापारीदृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या दाळमंडई, सर्जेपुराच्या प्रवेशद्वारापर्यंत भरत असलेला मंगळवारचा बाजार, गंजबाजार , विविध प्रकारच्या बेकर्‍या, पेट्रोलपंप अशा परिसरातून सर्जेपुराचा रस्ता महेश चित्रपटगृहापर्यंत जातो. या भागात एसटी महामंडळाचे नगर विभागीय कार्यालय आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलेले आहेत. विविध वाहनांचे स्पेअर पार्टची दुकाने, गॅरेजची दुकाने, रस्त्यातच वर्षानुवर्षे बंद स्थितीत उभी असलेली दुचाकी, चारचाकी वाहने, महेश थिएटरकडे जाताना जवळच असलेले पेट्रोल पंप यामुळे येथे वाहनांची मोठी वाहतूक कोंडी झालेली आढळते.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे या परिसराची मोठी दाणादाण उडाली होती. त्यातच महापालिकेच्या झेंडीगेट प्रभाग समिती कार्यालयाने सर्जेपुरातील एसटी महामंडळाच्या नगर विभागीय कार्यालयासमोरील रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई केली.
महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने अचानक केलेल्या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांची चांगलीच त्रेधा उडाली होती. चहाच्या टपर्‍या आणि छोटेखानी बांधलेल्या टप्प्यांवर ही कारवाई झाली. या परिसरातील अतिक्रमणधारकांनी छोटी टपरी असल्याचे भासवून टपरीच्या चारी बाजूंनी खांब टाकून ते सिमेंट व वाळू टाकून जवळपास पक्की बांधकामे केली होती. अशाप्रकारची पेपर टक्के बांधकामेही मनपा अतिक्रमणपथकाने हटविली होती.
कोणतीही पूर्वसूचना न देता महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने सरसकट केलेल्या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांची चांगलीच धांदल उडाली. महापालिका प्रशासनाचा रोष नको म्हणून कारवाई करण्यास सुरु केल्यावर काही अतिक्रमणधारकांना पुढे होत स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली. ही सर्व अतिक्रमण काढून घेईपर्यंत महापालिका पथक तेथेच तळ ठोकून होते.
अतिक्रमण हटविण्याची कारवाई चालू असताना महापालिका पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे कारवाईदरम्यान अतिक्रमण धारकांबरोबर बाचाबाचीचे प्रसंगही झाले. सर्जेपुरातील काही अतिक्रमणधारकांनी पथकातील अधिकार्‍यांविरूद्ध आरडाओरडा करत शिवीगाळही केल्याचे सांगितले जाते. परंतु मोठा पोलिस बंदोबस्त असल्यामुळे अतिक्रमणधारकांच्या विरोधाला धार उरली नाही.सर्जेपुरातील कारवाईबरोबरच प्रादेशिक परिवहन कार्यालयसमोर असलेल्या अतिक्रमणधारकांवर ही पथकाने कारवाई केली. पावसाळ्याच्या तोंडावरही कारवाई झाल्याने अतिक्रमणधारकांची चांगलीच पळापळ झाली.