Breaking News

आठवलेंच्या कवितांनी मोदी, सोनियांना हसू

नवीदिल्ली
राजस्थानातील कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यानंतर त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक खासदारांनी अभिनंदन केले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही आपल्या खुमासदार शैलीत ‘परफेक्ट मॅन’ म्हणत बिर्ला यांचे अभिनंदन केले आणि सभागृहात एकच हशा पिकला. मोदी, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि खुद्द बिर्ला यांनाही आठवले यांच्या कवितांनी हसू आवरले नाही.
इतर मंत्र्यांनी, खासदारांनी बिर्ला यांचे अभिनंदन केल्यानंतर लोकसभेत आठवले उभे राहिले आणि त्यांनी अभिनंदनाच्या कवितेचे सादरीकरण सुरू केले. ‘एका देशाचं नाव आहे रोम, लोकसभेचे अध्यक्ष झाले बिर्ला ओम’ कवितेची ही पहिली ओळ उच्चारताच उपस्थितांच्या चेहर्‍यावर स्मित हास्य झळकले. या वेळी आठवले यांनी बिर्ला यांना एक छोटासा सल्लाही दिला. ‘लोकसभेचे कामकाज तुम्हाला चालवायचे आहे, वेलमध्ये येणार्‍यांना ब्लॅकलिस्ट करायचे आहे,’ हे ऐकताच बिर्लांनाही हसू फुटले. नरेंद्र मोदींचे मन विशाल, राहुल गांधी राहो खुशाल, असे आठवले यांनी म्हणताच मोदी यांनाही हसू लपवता आले नाही. ‘तुमचे राज्य आहे राजस्थान, लोकसभेची तुम्ही झाले शान, भारताची आम्हाला वाढवायचीय शान, ओम बिर्ला लोकसभेसाठी परफेक्ट मॅन,’ अशा शब्दांत आठवले यांनी आपल्या कवितेचा समारोप करताच लोकसभेत मोठा हशा पिकला आणि वातावरण प्रसन्न झाले.
आपल्या कवितेतून आठवले यांनी फक्त बिर्ला यांचे अभिनंदन केले नाही, तर काँग्रेसला चिमटेही काढले. राहुल गांधी सत्तेत असताना आपण त्यांच्यासोबत होतो. या वेळी निवडणुकांच्या आधी युपीएसोबत येता का, अशी विचारणा राहुल गांधी यांनी आपल्याला केली होती; पण हवेची दिशा ओळखून आपण भाजपसोबतच राहिलो अशी मिश्कील टीका आठवले यांनी गांधी यांच्यावर केली. ही पाच वर्षं नाही तर येणार्‍या वर्षानुवर्षांत आम्ही काँग्रेसला सत्तेत येऊच देणार नाही, अशी घोषणा आठवले यांनी कवितेच्या माध्यमातून केली आणि लोकसभेत एकच हशा पिकला.