Breaking News

खंडीत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

अहमदनगर /प्रतिनिधी
शहरातील मुख्य बाजारपेठेत वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यापारी व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अनियमित वीज पुरवठ्यामुळे दुकानातील विद्युत उपकरणे नादुरुस्त, निकामी होत असून त्यास महावितरणचा ढिसाळ कारभार कारणीभूत आहे. तरी बाजारपेठेतील वीज पुरवठा सुरळीत सुरु राहण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अन्यथा महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा व्यापार्‍यांनी दिला आहे.
यासंदर्भात भाजपा युवा मोर्चाच्या व्यापारी आघाडीचे प्रमुख अविनाश साखला यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. 12 ) महावितरणचे कार्यकारी अभियंता नितीन धर्माधिकारी यांना िंनवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी नितीन जोशी, सद्दाम शेख, मयूर सोनाग्रा, हमजा चुडीवाला, लक्ष्मीकांत तिवारी, विजय चोपडा, अज्जू शेख, ज्ञानेश्‍वर काळे यांच्यासह व्यापारी, व्यवसायिक उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेत शहरातील मुख्य बाजारपेठ असणार्‍या गंजबाजार, मोचीगल्ली परिसरात अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्‍न गंभीर असून त्यामुळे अनेकदा व्यापारी व्यवसायिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या परिसरात स्वतंत्र डीपी बसवून व्यापार्‍यांची अडचण दूर करावी. डीपीसाठी सर्व व्यापारी मिळून जागा उपलब्ध करून देतील त्यासाठी आवश्यक तसा पाठपुरावा करण्यास आम्ही तयार असल्याचे साखला यांनी यावेळी सांगितले.त्यावर कार्यकारी अभियंता धर्माधिकारी यांनी लगेचच सहायक अभियंता संदेश पगारिया, उपकार्यकारी अभियंता एच.एल. बराडे यांना बोलावून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी व्यापार्‍यांनी आपल्या मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंत्यांना दिले. या निवेदनात म्हटले की, शहरातील मोचीगल्ली, गंजबाजार येथे रोज अवेळी वीजपुरवठा खंडीत होत आहे. हा वीज पुरवठा कमी दाबाने व जास्त दाबाने होत असल्याकारणाने व्यापार्‍यांच्या दुकानातील विद्युत उपकरणे निकामी होत आहेत व त्यातून शॉर्टसर्किट होत आहे. महावितरणच्या ह्या ढिसाळ कारभारांमुळे व्यापार्‍यांची वित्तीय हानी चालू आहे. त्यामुळे वीज पुरवठा व्यवस्थित करून कोणतीही हानी होणार नाही याची काळजी महावितरणाने घ्यावी, अन्यथा सर्व व्यापार्‍यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.