Breaking News

काँग्रेसला दहावा ग्रह अडचणीचा

लोकसभेच्या निवडणुकीत झालेला दारूण पराभव, त्यानंतर काँग्रेस सोडणार्‍यांची वाढलेली संख्या, पराभव होऊनही काँग्रेसच्या नेत्यांच्या मानसिकतेत न झालेला बदल आणि पराभवानंतरही परस्परांचे पाय ओढण्याची लागलेली शर्यत यामुळं काँग्रेस अगोदरच अडचणीत आली असताना सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वधेरा यांच्यामुळं काँग्रेसच्या अडचणीत आणखीच भर पडली आहे. 

पूर्वी आपल्या अवकाशविश्‍वात नऊ ग्रह असल्याचं मानलं जात होतं. त्यानंतर कितीतरी ग्रहांचा शोध लागला असला, तरी अजूनही आपण नऊच ग्रह मानतो. अवकाशविश्‍वातील नऊ ग्रहानंतर कौटुंबिक व्यवस्थेत जावयाला दहावा ग्रह मानण्याची परंपरा आहे. हा दहावा ग्रह कायम त्रासाचाच असतो, अशी आपली पारंपरिक समजूत आहे. सर्वंच जावई वाईट असतात असं नाही; परंतु जावयांमुळं अडचणीत आलेल्या सासर्‍यांची संख्या जास्त असल्यानं कदाचित जावई माझा भला असं म्हणण्याची प्रथा रूढ झाली असावी. सोनिया गांधी यांच्या जावयांच्या बाबतीत तसं झालं आहे. सोनियांचे जावई रॉबर्ट वधेरा यांच्यामुळं केवळ गांधी कुटुबीयांचीच अडचण होते असं नाही, तर काँग्रेसचीही अडचण होते. वधेरा यांच्यावर गेल्या सहा-सात वर्षांपासून बेहिशबी मालमत्ता, जमिनी बळकावण्याचा आरोप होत असून काळ्या पैशाच्या व्यवहाराचे तसेच मनी लाँड्रिगप्रकरणाचेही आरोप आहेत. कुणालाही न घाबरणारा चौकीदार पाच वर्षे सत्तेत असूनही त्याला अजून वधेरा यांच्यावरील आरोप सिद्धतेपर्यंत जाता आलं नाही. लोकसभेच्या निवडणुकीत वधेरा यांच्यावरील आरोप, नेमकी त्याच काळात त्यांची अंमलबजावणी संचालनालयानं केलेली चौकशी यामुळं काँग्रेस बॅकफुटवर गेली होती. लोकसभेत भाजपला यश मिळाल्यानंतर आता चौकशीला पुन्हा गती देण्यात आली आहे. मंगळवारी वधेरा यांची बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ईडीनं 13 व्यांदा चौकशी केली. या चौकशी दरम्यान अनेक महत्त्वाचे गौप्यस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. वधेरा यांचे जवळचे व्यावसायिक मित्र सी.सी. थंपी यांनी सोनिया गांधी यांच्या खासगी सचिवाने वधेरा यांची ओळख करुन दिली असल्याची माहिती चौकशी दरम्यान दिली आहे. वधेरा यांची दुबई व लंडन येथे बेहिशोबी मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. वधेरा यांनी दुबईत 14 कोटींचा व्हिला आणि लंडन येथील ब्रेन्स्टन स्क्वेअर येथे 26 कोटींचा फ्लॅट खरेदी केल्याचा आरोप आहे. थंपी यांनी मनी लाँड्रिंग आणि बेहिशोबी मालमत्ता खरेदी करण्यासाठी वधेरा यांना मदत केल्याचा आरोप आहे. ई़डीने केलेल्या चौकशीत वधेरा आणि थंपी यांच्या जबाबात विरोधाभास असल्याचं निदर्शनास आलं आहे. ईडीने कोर्टात हे जबाब साक्ष म्हणून सादर केले आहेत. या विरोधाभासी जबाबामुळे तपास अधिकार्‍यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असून वधेरा यांना ताब्यात घेण्याची मागणी ईडीने केली आहे. 

परदेशातील कथित बेकायदा मालमत्ता खरेदी प्रकरणी (मनी लाँडरिंग) सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेव्हणे रॉबर्ट वधेरा यांना मंगळवारी हजर करण्यात आले. 31 मे रोजी त्यांना समन्स बजावण्यात आलं होतं; परंतु त्या वेळी प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी ईडीसमोर हजर राहणं टाळलं. मनी लाँडरिंगप्रकरणी 11 वेळा, तर राजस्थानमधील बिकानेरमधील भूखंड गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’च्या जयपूर कार्यालयात वधेरा दोन वेळा हजर राहिले आहेत. तपासणीदरम्यान वधेरा सहकार्य करत नसल्याबद्दल ‘ईडी’नं न्यायालयाकडं त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. एकीकडं ‘ईडी’नं वधेरा यांच्या अटकेची परवानगी मागितली असताना न्यायालयानं मात्र अजून परवानगी दिलेली नाही. उलट, उपचारासाठी त्यांना परदेशी जाण्याची परवानगी दिली आहे. लंडनमधील त्यांच्या मालमत्तेबाबत चौकशी चालू असल्यानं लंडनला मात्र जाता येणार नाही, असं न्यायालयानं बजावलं आहे. वधेरा यांना दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयानं दिलासा दिला आहे. वैद्यकीय उपचारांकरिता सहा आठवड्यांसाठी विदेशात जाण्यास त्यांना न्यायालयानं परवानगी दिली आहे. वधेरा यांना न्यायालयानं उपचारासाठी अमेरिका आणि नेदरलँडला जाण्याची परवानगी दिली आहे. सहा आठवड्यांसाठी त्यांना विदेशात जाता येणार आहे. आता ते विदेशवारीचं वेळापत्रक न्यायालयात सादर करतील. दुसरीकडे ‘ईडी’नं त्यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. लंडनमध्ये वधेरा यांची मालमत्ता आहे. त्यामुळं ‘ईडी’नं गेल्या सुनावणीवेळी त्यांना लंडनमध्ये जाण्यास विरोध केला होता. त्यांना लंडनलाच का जायचं आहे, असा प्रश्‍न ‘ईडी’नं उपस्थित केला होता. त्यावर तिथंच योग्य उपचार मिळतील, अन्यथा तुम्ही ठिकाण सांगा, तिथं जाईल असं वधेरा म्हणाले होते. अमेरिका आणि नेदरलँड असे पर्यायही वधेरा यांनी दिले होते. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं त्यांना उपचारासाठी या दोन्ही देशांत जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळं ‘ईडी’ला झटका बसला. तत्पूर्वी, विदेशात जाण्यासाठी परवानगी मागणार्‍या वधेरा यांच्या याचिकेवरील निकाल न्यायालयानं तीन जूनपर्यंत राखून ठेवला होता. त्यापूर्वी बिकानेर जमीन व्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) वधेरा यांची सुमारे 9 तास चौकशी केली. वधेरा यांच्यासह त्यांची आई मौरीन यांचीही ‘ईडी’कडून चौकशी करण्यात आली. 

काँग्रेस सरचिटणीसपदाची सूत्र हाती घेताच भाजपनं प्रियंका गांधी यांच्यावर हल्लाबोल केला होता. प्रियंका यांचे पती रॉबर्ट वधेरा यांनी पेट्रोलियम डीलमधून लंडनला कोट्यवधींची मालमत्ता जमवली आहे, असा आरोप भाजपनं केला. काँग्रेस भवनबाहेर लावलेल्या पोस्टरमधील दोघेजण जामिनावर आहेत. एक म्हणजे राहुल गांधी, ज्यांच्यावर नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी 5 हजार कोटींचा अपहार केल्याचा आरोप आहे. तर दुसरे त्यांचे भावोजी रॉबर्ट वधेरा. जे मनी लाँड्रींग प्रकरणी ‘ईडी’समोर हजर होणार आहेत’, अशी टीका भाजपनं केली होती.  डॉ. मनमोहन सिंग यांच्या पहिल्या सरकारच्या काळात वधेरा यांनी लंडनमध्ये कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवली आहे. वधेरा यांच्या लंडनमध्ये एक-दोन नव्हे, तर तब्बल 8 मालमत्ता आहेत. त्यातील प्रत्येक मालमत्तेची किंमत कोट्यवधींवर आहे, असा आरोप भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला. सेंटेक इंटरनॅशनल नावाची कंपनी वधेरा यांचे अतिशय निकटवर्ती मानले जाणारे संजय भंडारी यांची आहे. पेट्रोलियम डीलमधील दलालीचा पैसा हा या कंपनीच्या खात्यात जमा झाला. त्याच पैशातून वधेरा यांनी लंडनमध्ये मालमत्ता खरेदी केल्या, असा गंभीर आरोप पात्रा यांनी केला. 2009मधील एका डीलचा दलालीचा पैसा हा दुबईतील स्कायलाइट नावाच्या कंपनीच्या अकाउंटमध्ये जमा झाला होता. या कंपनीचे मालक सी.पी. थंपी आहेत आणि थंपी यांची 1000 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी फेमा अंतर्गत चौकशी सुरू आहे. थंपी हे भंडारी आणि वधेरा यांच्यासाठी काम करतात. या आरोपांना काँग्रेसनं वारंवार उत्तरं दिली. चंदीगड येथील जमिनीचं आरक्षण निवासी इमारतींसाठी असताना त्यांचं आरक्षण न बदलताच त्यावर व्यापारी संकुलं बांधण्यात आली आणि त्या इमारतींची विक्री करण्यात आली, असाही आरोप वधेरा यांच्यावर होता. या प्रकरणात माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुडा यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला होता. अशोक खेमका नावाच्या एका अधिकार्‍यानं या प्रकरणाची चौकशी करून अहवाल दिला होता. लंडन येथील मालमत्तेचा ‘ईडी’नं दिलेला तपशील आणि प्रत्यक्षात त्या मालमत्तेच्या मालकीचा एका वृत्तपत्रानं तिथं जाऊन शोध घेतला, तेव्हा त्यात वेगळीच माहिती पुढं आली. ती मालमत्ता एका ब्रिटीश दांपत्याची असल्याचं संबंधित वृत्तपत्रानं कागदोपत्री पुरावा जमा करून सिद्ध केलं होतं. या पार्श्‍वभूमीवर चौकशीतून काय होतं, हा भाग वेगळा असला, तरी वधेरा यांच्यामुळं काँग्रेसमागचं शुक्लकाष्ठ काही संपत नाही, एवढं खरं.