Breaking News

वृक्षसंवर्धनासह प्लास्टीक मुक्तीच्या मार्गावरून निवृत्ती नाथांची पालखीची वाटचाल

नाशिक/प्रतिनिधी
संत निवृत्ती नाथांची पालखी श्री त्र्यंबकेश्वर येथुन श्री क्षेत्र पंढरपुकडे मंगळवारी ( ता. 18) जून रोजी प्रस्थान करीत आहे.  दरवर्षीप्रमाणे यंदाही वारीच्या निमित्ताने वृक्ष लागवड, प्लास्टिक मुक्ती असे विधायक उपक्रम राबवत वारीची पाऊलवाट निराळी ठरणार आहे. वारीत सहभागी सामाजिक संस्था , सेवाभावी मंडळे, यांनी वारकऱ्यांना आपापल्या परीने मदत केली आहे. परंतु केवळ सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या या संस्थावर अधिक जबाबदारी न देता स्वतः पालकमंत्री ना. गिरीश महाजन ,भाजपातील, सर्व सन्माननीय स्थानिक आमदार, व खासदार महोदयांनी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या प्रश्नांना व पालखी सोहळ्यातील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी सहभाग द्यावा, असे आवाहन, संत निवृत्तीनाथ संस्थांचे अध्यक्ष ह.भ. प. पंडित महाराज कोल्हे व पालखी सोहळा प्रमुख पुंडलीक थेटे केले आहे.
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ पालखी महाराष्ट्रतील सात मानाच्या समजल्या जाणाऱ्या पालख्यांपैकी एक आहे परंतु नाथांच्या पालखी सोहळ्याकडे ज्या आस्थेने पाहायला हवे, तेवढे लक्ष दिले जात नाही आळंदीच्या धर्तीवर पालखी सोहळा हा महाराष्ट्रभर संस्मरणीय ठरावा, यासाठी राजकीय स्तरावर प्रयत्न करायला हवे असेही थेटे यांनी सांगितले.या वर्षीही चांदीच्या सजवलेल्या रथातून नाथांच्या पादुका पंढरपूरला नेण्यात येणार आहेत, त्यासाठी रथाची बैलजोडी निवडण्यातही आली आहे .श्रीराम वारकरी मंडळ मखमलबाद यांचे पालखी सोहळ्यासाठी सहकार्य राहणारअसून, अंबड येथील दत्तात्रेय दातीर, यांची बैलजोडी पालखी रथाला राहणार आहे.
दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतीची कामे कमी आहेत, त्यामुळे पालखी सोहळयात यंदा अधीक वारकरी सहभागी होतील. येणारे वर्ष शेतकरी व शेतमजूराना सुखाचे जावे, यासाठी वारकरी विठुरायाच्या चरणी साकडे घालणार आहेत.
पंढरपूरला जाणाऱ्या वारीत मोबाईल शौचालय असणार आहे. तसेच वारीच्या मुक्कामी भारनियमन करू नये, अशी मागणीही थेटे यांनी केली आहे. वारीच्या मार्गावर ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम आहे, त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा उपक्रम यंदाही अखंड राहणार आहे. प्रसार माध्यम वारीतील वृत्ताकन नेहमी मनापासून करत आलेले आहेत, यंदाही माध्यमांनी नाथांच्या पालखीची यथासांग माहिती प्रसारित करावी असे आवाहनही पंडित महाराज कोल्हे, पुंडलिकराव थेटे, त्रंबकराव गायकवाड, संजय महाराज धोंगडे , आदींनी केले आहे