Breaking News

रेल्वेत 2.94 लाख पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली

रेल्वेने विविध श्रेणीतील 2.94 लाख पदांच्या भरतीची प्रक्रिया रेल्वेने सुरू केली आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत दिली. पीयूष गोयल पुढे म्हणाले की रेल्वेतील कर्मचार्‍यांच्या 1 जून 19 पर्यंतच्या आकडेवारीनुसार रेल्वेमधील अ, ब, क आणि पूर्वाश्रमीच्या ड श्रेणीत 2,98,574 पदे रिक्त आहेत. रिक्त जागा भरणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. गेल्या दहा वर्षांत रेल्वेत 4.61 लाख लोकांची भरती करण्यात आली. 1991 मध्ये रेल्वेकडे 16,54,985 कर्मचारी होते. 2019 मध्ये 12,48,101 कर्मचारी आहेत. कर्मचारी संख्या कमी झाली असली, तरी रेल्वेच्या सेवेवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. दरम्यान, रेल्वेच्या खासगीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही, अशी माहिती पीयूष गोयल यांनी लोकसभेला दिली. रेल्वेने दोन गाड्या खासगी संस्थांना चालवायला दिल्याच्या वृत्ताच्या संदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात गोयल म्हणाले की, ‘खासगी संस्थांना चालवायला देण्यासाठी अजून कोणतीही गाडी निश्‍चित करण्यात आलेली नाही. सरकारने अधिकृत माहिती दिली नसली, तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली-लखनौ ‘तेजस’ एक्स्प्रेस खासगी संस्थेला चालवायला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे कळते.