Breaking News

शेवगाव पंचायत समितीत चोरी ; 47 हजारांचे साहित्य लंपास

शेवगाव /प्रतिनिधी
शेवगाव पंचायत समिती एकात्मिक महिला, बालविकास प्रकल्प व शिक्षण विभागातील संगणक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना आज (सोमवार) घडली. चोरट्यांच्या शोधार्थ आलेले श्‍वानपथक पावसामुळे माग काढू शकले नाही.
शेवगाव पंचायत समितीच्या जुन्या इमारतीत असणार्‍या सभागृहात एकात्मिक महिला, बालविकास प्रकल्प व त्या शेजारीच शिक्षण विभाग आहे. रविवार दि.30 ते सोमवार दि.1 मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी या कार्यालयाचा अर्धा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. 
बालविकास प्रकल्प व शिक्षण विभागातील सगंणक, मॉनीटर, बॅटरी असे 47 हजार 500 रुपयाचे साहित्य चोरुन नेले. सोमवारी सकाळी येथील रात्रपाळीचे रखवालदार काकासाहेब थोरात यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी संबंधीत अधिकार्‍यांना याची माहिती दिली.
पोलीसांना खबर मिळताच श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले मात्र पावसामुळे श्‍वानपथक आवारातच घुटमळत राहिल्याने माग काढता आला नाही.याबाबत कक्ष अधिकारी श्रीराम चव्हाण यांनी उशीरा दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस नाईक बबन पालवे हे करीत आहेत.