Breaking News

कामचुकारपणा करणार्‍यांवर कारवाई करणार ः महापौर वाकळे

अहमदनगर/प्रतिनिधी
येथील प्रभाग क्रमांक 4 मध्ये यशवंत कॉलनी  व विराज कॉलनी परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ओपन असलेल्या ड्रेनेजलाइनमधून पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन गेले असून सर्व घाण पाणी पिण्यासाठीच्या नळाद्वारे येत असल्याने आजाराचे प्रमाण वाढले आहे.  या परिसरामधील नागरिक वेळोवेळी महानगरपालिकेमध्ये आपला टॅक्स वेळेवर भरत असतात. तरीही या परिसरामध्ये कोणतीही सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने आज राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह महापौर बाबासाहेब वाकळे यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी परिसरांमध्ये घाणीचे साम्राज्य व वेगवेगळ्या ठिकाणी ड्रेनेज लाइन वरती आढळल्याने महापौरांनी केअरटेकर व संबंधितांची चांगलीच कानउघाडणी केली.  या पुढील काळात कोणीही कामात हलगर्जीपणा केल्यास निलंबनाची कारवाई केली जाईल, असे सांगून या भागातील प्रश्‍न मार्गी लावण्याबाबत संबंधितांना सूचना देऊन तातडीने हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.
यावेळी अजिंक्य बोरकर, अमोल गाडे, नगरसेवक कुमार वाकळे, सुनील त्र्यंबके, डॉ. सागर बोरुडे, अ‍ॅड.आर.बी.लोटे, डॉ. दीपक, जाधव, गौरव नय्यर, शांतीलाल कोठारी, बाळू धाडीवाल, रोनक आहुजा व त्याचबरोबर परिसरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या परिसरातील सर्व समस्या आठ दिवसांमध्ये मार्गी लावल्या नाही तर राष्ट्रवादीच्या वतीने महानगरपालिकेवर तीव्र स्वरूपाचे आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचे माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी सांगितले.