Breaking News

धोनीला वरच्या क्रमांकावर न खेळवण्याची चूक पडली महागात

नवी दिल्ली
विश्‍वचषक उपांत्य सामन्यात भारताच्या पराभवाची नेमकी कारणे काय? याची कारण मिमांसा आता सुरु झाली आहे. आघाडीच्या फलंदाजांचे अपयश (रोहित, राहुल व कोहली) हे मुख्य कारण मानले जात असले तरी फलंदाजांचे क्रम व्यवास्थित ठेवले असते तर रोहित-राहुल-कोहलीच्या अपयशानंतरही आपण जिंकू शकलो असतो असे बर्‍याच माजी अनुभवी क्रिकेटपटूंनी म्हटले आहे.
धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवणे ही विराट कोहलीची फार मोठी चूक होती. हार्दिक पांड्या व दिनेश कार्तिक यांना कोहलीने कोणत्या विचाराने धोनीपेक्षा वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले यावर सौरव गांगुली व व्ही.व्ही. एस. लक्ष्मणसह बर्‍याच माजी क्रिकेटपटूंनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. लक्ष्मणने म्हटले आहे की पांड्या व कार्तिकच्या आधी धोनीने फलंदाजीला येण्यासारखी स्थिती होती. 3 बाद 5 आणि 4 बाद 24 नंतर संयमाने पाय रोवून खेळणार्‍या अनुभवी फलंदाजाची खेळपट्टीवर गरज होती. धोनीसाठी ही योग्य परिस्थिती होती. 2011 मध्ये अंतिम सामन्यातही धोनी युवराजसिंगच्या आधी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता आणि आपण जिंकलो होतो याची लक्ष्मणने आठवण करून दिली. सौरव गांगुली म्हणाला की, धोनीची फलंदाजीच नाही तर समोरच्या टोकाला असलेल्या तरुण फलंदाजांना त्याच्या शांत व संयमी वृत्तीनेही बराच फरक पडतो. ऋषभ पंतने स्थिरावल्यावर फिरकीवर आक्रमणाच्या प्रयत्नात विकेट फेकली. त्यावर कोहलीने स्पष्टपणे नाराजी व्यक्त केल्याचेही दिसले. त्याक्षणी खेळपट्टीवर अनुभवी फलंदाजाची गरज होती. त्यावेळी धोनी तिथे असता तर त्याने पंतला तो फटका खेळण्यापासून परावृत्त केले असते. हवेच्या झोताविरुध्द खेळणे इंग्लंडमध्ये नेहमीच धोकादायक ठरले आहे. धोनीने त्याला फिरकीपेक्षा मध्यमगती गोलंदाजावर हल्ला करण्याचे सुचवले असते. सुसंवाद ही धोनीची खासियत आहे आणि जडेजासोबत तो दिसून आला. म्हणून धोनीला सातव्या क्रमांकावर पाठवणे चुकीचेच होते असे गांगुलीने म्हटले आहे. सचिन तेंडूलकरनेही या मताशी सहमती दाखवली आहे. आणिबाणीच्या क्षणी धोनीसारखा अनुभवी फलंदाज तिथे असायलाच हवा. शेवटी तो जडेजाशी बोलून डमेज कंट्रोल करताना दिसलाच. म्हणून हार्दिकऐवजी धोनीला पाठवायला हवे होते आणि कार्तिक पाचव्या क्रमांकावर याचा तर विचारही केला नव्हता असे मास्टर ब्लास्टरने म्हटले आहे. तुम्ही नेहमीच रोहीत व विराटवर अवलंबून राहू शकत नाही असे लक्ष्मणने म्हटले आहे.