Breaking News

सातव्या वेतनसाठी महापालिका कर्मचारी आक्रमक

अहमदनगर/प्रतिनिधी
राज्यातील महापालिका कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू होऊन अनेक दिवस झाले तरी अद्याप अहमदनगर महापालिकेत वेतन आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. परंतु आता आदेशाची अंमलबजावणी होण्यासाठी महापालिकेतील कर्मचार्‍यांनी आग्रही भूमिका घेतलेली आहे. तसेच मनपा कर्मचारी आपल्या भूमिकेवर कायम असून त्यासाठी आक्रमक धोरण अवलंबिले आहे.
संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सरचिटणीस आनंदराव यांनी ही नोटीस प्रशासन आणि महापौरांना दिली असून या नोटीसीतही सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीचा उल्लेख केला आहे. या मागणीची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेला कामगार युनियनने 15 जुलैपर्यंतची मुदत दिलेली आहे. महापालिकेने नोटिसीचा विचार करुन त्वरित अंमलबजावणी न केल्यास 15 जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा कामगार युनियने दिला.
दरम्यान, माजी विरोधी पक्षनेता आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नगसेवक बाळासाहेब बोराटे यांनी महापौरांकडे कर्मचार्‍यांना सातवा वेतन देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. महासभेत सातवा वेतन आयोगाचा विषय घेण्यात आला होता. परंतु त्यावर चर्चा झाली नाही. कर्मचार्‍यांना आता सातवा वेतन आयोगाची उत्सुकता असून त्यासाठी महासभा बोलविण्याची मागणी नगरसेवक बोराटे यांनी केली.