Breaking News

दोन कुटुंबांचे जीवन आनंदी होण्यासाठी लोकन्यायालयाची मदत

अहमदनगर/प्रतिनिधी
“आपण मानवी जीवनात सर्वच प्रकारच्या विषयांमध्ये तडजोड करतो. परंतु न्यायालयीन प्रक्रियेत प्रत्येक व्यक्तिचा स्वाभिमान, मीपणा जागृत होतो. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत प्रत्येक व्यक्तिचा पैसा आणि वेळ वाया जाते. परंतु आपल्या न्याय्य हक्कासाठी लोकन्यायालयात जायला पाहिजे. त्यासाठी दोन्ही पक्षकारांनी आपसातील मतभेद मिटवावेत. लोकन्यायालयात एकमेकांबद्दलचा राग, द्वेष कमी होतो. दोन्ही कुटुंबाचे जीवन आनंदी होण्यासाठी लोकन्यायालयाची मदत होते. तरी लोकन्यायालयात प्रकरणे मिटविण्यासाठी अधिकारी-वकिलांना सहकार्य करावे’’, असे आवाहन प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश कमलाकर कोठेकर यांनी केले आहे.
जिल्हा न्यायालयात शनिवारी (दि. 13) राष्ट्रीय लोकअदालतचे उद्घाटन न्या.कोठेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना न्या. व्ही. व्ही. बांबर्डे म्हणाले की, “पक्षकारांनी आपापसातील मतभेद मिटवावेत. लोकन्यायालयात प्रकरणे मिटविल्यामुळे आपसातील कटुता कमी होते.’’
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुनीलजीत पाटील म्हणाले, “न्यायालयीन प्रक्रियेत निकाल मिळेल पण न्याय मिळणार नाही. या प्रक्रियेत एकाच पक्षकाराला न्याय मिळू शकतो. परंतु लोकन्यायालयात (लोकअदालत) दोघांनाही न्याय मिळेल. यासाठी सर्व पक्षकारांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून आपली प्रकरणे मिटवावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे. या लोकन्यायालयात खटलापूर्व प्रकरणे 8722 आणि प्रलंबित 14340 असे एकूण 23062 प्रकरणे न्यायालयात ठेवण्यात आली आहेत. त्यात मोटार अपघात, लवाद, हिंदू विवाह, वीजवितरण, मोटार अपघात, दरखास्ती, एनआय अ‍ॅक्ट 138, बीएसएनएल आणि फायनान्स कंपन्यांसंदर्भातील प्रकरणांचा समावेश आहे.
यावेळी न्या. एस. डी. जवळगेकर, न्या.एस.आर.जगताप, अ‍ॅड. एस.के.पाटील, अ‍ॅड. सुभाष काकडे, अ‍ॅड.शेखर दरंदले, न्या. ए. बी. भिलारे, न्या. एम.व्ही.देशपांडे, न्या. ए. एम. शेटे, न्या.एन.एस.सय्यद, प्रबंधक चंद्रकांत तरडे आदी उपस्थित होते.


लोकन्यायालयात वृद्ध महिलेची हजेरी
लोकन्यायालयात 105 वर्षे वयाच्या वृद्ध महिलेस आणण्यात आले होते. नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथील हौसाबाई गंगाधर चोभे असे या वृद्ध महिलेचे नाव असून त्यांच्या कुटुंबीयांनी जमिनीच्या प्रकरणात त्यांना लोकन्यायालयात हजर केले होते.