Breaking News

आनंदवनातील वनमहोत्सवात मुख्यमंत्र्यांनी लावले रोपटे

33 कोटी वृक्षलागवडीच्या मोहिमेला सुरूवात

चंद्रपूर
राज्यात वनमहोत्सवाला सोमवारी सुरूवात झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे आनंदवनात रोपटे लावून या वृक्षलागवडीच्या मोहीमेला सुरूवात करण्यात आली. वनमहोत्सवाचा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये समावेश झालेला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष दखल घेतलेल्या 50 कोटी वृक्ष लागवडीचा यावर्षीचा वन महोत्सवाची सुरूवात चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे असलेल्या आनंदवनातून सुरू झाली.
हवामानातील बदल व वैश्‍विक तापमानात झालेली वाढ या जागतिक समस्या असून यामुळे महाराष्ट्रसुद्धा होरपळत आहे. यामुळे राज्याला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. ही बाब हेरून राज्याचे अर्थ, नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 2016 या वर्षापासून हरित महाराष्ट्र अभियान सुरू केले. त्याअंतर्गत 2016 साली दोन कोटी वृक्षांची तर 2017 साली चार कोटी व 2018 साली 13 कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्याने 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवले असून उर्वरित 33 कोटी वृक्षांची लागवड करणे अजूनही शिल्लक आहे. हे अभियान यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी राज्यस्तरावर सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्टे ठरवून दिलेले आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याने एक कोटी 67 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट स्वीकारलेले आहे. यामध्ये वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, वन विकास महामंडळ, आदिवासी विभागचे प्रकल्प कार्यालय, जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालय, कृषी विभाग, चंद्रपूर महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामपंचायत इ. कार्यालयांचा यात समावेश आहे. अशा शासनाच्या विविध विभागांमार्फत खोदलेल्या खड्ड्यांची माहिती ऑनलाईन प्रणालीत अपलोड केलेली असून त्यानुसार रोपांची मागणी करण्यात आलेली आहे.काय आहे वनमहोत्सव?
हा वनमहोत्सव 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2019 दरम्यान राबवल्या जाणार आहे. ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती नेमली असून या समितीचे अध्यक्ष स्वत: जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार तर सचिव म्हणून चंद्रपूरचे विभागीय वन अधिकारी एस. एल. सोनकुसरे आहेत. या समितीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनातल्या सर्व विभागांच्या कार्यालयाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.