Breaking News

शेतकऱ्यांसाठी मोफत विमा अर्ज भरून द्यावेत:गायकवाड

पारनेर/प्रतिनिधी
शेतकऱ्यांचे सेतू केंद्र चालक व सीएससी केंद्र चालक यांनी अचूक पद्धतीने पीक विमा अर्ज भरून घ्यावेत. तातडीने ते जिल्हा बँक किंवा इतर संबंधित बँकेकडे जमा करावेत. सर्व गट सचिवांनी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा भरण्यासाठी सहकार्य करावे. तसेच सर्व सेतू केंद्र संचालकांनी व सीएससी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांसाठी मोफत विमा अर्ज  भरून द्यावेत असे आवाहन पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी केले.

   प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०१९-२० मध्ये पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा भरताना येणाऱ्या अडी अडचणी व समस्या सोडवण्यासाठी सोमवारी कृषी विभाग, अहमदनगर आणि जिल्हा सहकारी बँक यांचे संयुक्त विद्यमाने पारनेर तालुक्यातील सर्व बँकेचे शाखा अधिकारी, गटसचिव, सेतू केंद्र संचालक व सीएससी केंद्र संचालकांची संयुक्ति कार्यशाळा पारनेर येथील जिल्हा बँक सभागृहात पार पडली. यावेळी ते बोला होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर, आत्माचे मा. उपसंचालक संभाजीराव गायकवाड, तालुका विकास अधिकारी इंद्रभान शेळके, ॲग्रीकल्चर इन्शुरन्स विमा कंपनीचे प्रतिनिधी भरत बाजवे तसेच सर्व शाखाधिकारी व सचिव उपस्थित होते. यावेळी सभापती प्रशांत गायकवाड यांनी मागील वर्षी विमा रकम मिळण्यासाठी शेतकऱ्यांना आलेल्या अडी अडचणींची माहिती दिली.

     कृषी उत्पन्न बाजार समिती, पारनेरच्या वतीने पारनेर येथील मुख्य कार्यालयात मोफत विमा भरण्याचे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच सभापती प्रशांत गायकवाड यांच्यावतीने वडझिरे, निघोज, जवळा, अळकुटी, ढवळपुरी, भाळवणी, सुपे, कान्हूर पठार, वाडेगव्हान, मांडवा व टाकळी ढोकेश्वर  याठिकाणी साई मल्टी स्टेट पतसंस्थेच्या शाखांमध्ये आणि नगर तालुक्यातही मोफत पीक विमा भरणा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती गायकवाड यांनी दिली.