Breaking News

वीमा कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे पैसे भरूनही विमा मिळाला नाही !

तालुक्यातील अनेक शेतकरी विम्यापासून वंचीत

केज | प्रतिनिधीः-
बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सोयाबीन पीक विम्यासाठी अनेक अडचणींना तोंड देत विमा मंजूर झाला व मागच्या दोन दिवसांपासून सोयाबीनचा पीक विमा खात्यावर येऊ लागला आहे मात्र यामध्ये अनेक शेतकर्‍यांनी विम्याचा विहित हप्ता भरून देखील त्यांना विमा मिळाला नसल्याचे आता समोर येत असून हे शेतकरी याबाबत चौकशी करण्यासाठी शासकीय कार्यालयात फिरत असून त्यांना कुठेही योग्य व खरी माहिती देखील मिळत नसल्याने आता दाद मागायची कोणाकडे हा प्रश्न या शेतकर्‍यांना पडला आहे.
 याबाबत सविस्तर वृत्तांत असा की सोयाबीन या पिकासाठी गेल्या वर्षी म्हणजे २०१८ च्या खरीप हंगामात तालुक्यातील शेतकर्‍यांनी मोठया प्रमाणात विमा भरला होता परंतु मागच्या दोन महिन्यांपासून हा विमा मिळणार की नाही यावर मोठ रणकंदन होऊन कसा बसा हा विमा मंजूर झाला व मागच्या दोन दिवसांपासून शेतकर्‍यांच्या खात्यावर या विम्याची थेट रक्कम पडू लागल्याने शेतकरी वर्गात आनंद पसरला होता कारण हे पैसे अगदी पेरणीच्या उपयोगात येणार असल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंद होता मात्र ज्या शेतकर्‍यांनी विमा भरला होता पैकी अनेक शेतकरी आता या विम्यापासून वंचीत रहात असल्याचे समोर आले असून शासनाने ठरवून दिलेल्या हप्त्यानुसार शेतकर्‍यांनी ऑनलाईन म्हणजे शासनमान्य सेतू मधून हे विमा रक्कम भरणा केली आहे व रक्कम विमा कंपनीकडे भरणा झाल्याची तशी पावती देखील शेतकर्‍यांना मिळाली मात्र प्रत्यक्षात बँकेत अनेकांच्या खात्यावर विम्याची रक्कम पडलीच नाही त्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच हवालदिल झाला असून अशा शेतकर्‍यांनी थेट तालुक्याचे कृषी कार्यालय गाठत तिथे बसलेला विमा कंपनीचा प्रतिनिधी गाठला मात्र ते देखील उडवाउडवीची उत्तरे देऊन शेतकर्‍यांना परत लावत आहेत त्यामुळे हे शेतकरी आता नेमकं जायच कुठे ? या प्रश्नात असून सरकारने विमा ऑनलाईन भरून घेऊन आता हा नवीनच वाद निर्माण केला आसल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत.

विमा कंपनीला कोर्टातखेचणार-सोनवणे
तालुक्यातील सारणी (आनंदगाव) येथील शेतकरी बप्पासाहेब भागवत सोनवणे यांच्या कुटुंबातील तीन खातेदाराच्या नावे असलेल्या क्षेत्रापैकी ७ हेक्टर ७ गुंठे क्षेत्रात सोयाबीन पीक होते व या क्षेत्राचा एकूण ६३८४ रु एवढा विमा हप्ता मी शासनाच्या अधिकृत महा इसेवा केंद्रावरून विहित मुदतीत भरला आहे व त्याच्या रीतसर पावत्या माझ्याकडे आहेत आणि पैसे मिळाल्याचा देखील त्यावर उल्लेख आहे परंतु माझ्या कुटुंबातील एकाही सदस्यांच्या नावाने विमा जमा झालेला नाही आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधीला याबाबत विचारल्यास बेजबाबदार पणे उत्तरे देत आहेत त्यामुळे मला या दोन दिवसांत विमा कंपनीने विमा दिला नाही तर मी कंपनीला कोर्टात खेचणार असून याचा जाब आपण रीतसर विचारणार असल्याचे बप्पासाहेब सोनवणे यांनी दै. लोकमंथन  शी बोलताना सांगितले.

मग पैसे गेले कुठे ?
या प्रकरणी शासनाचे अधिकृत असलेले महाइसेवा केंद्र चालकाशी संवाद साधला असता त्यांनी या शेतकर्‍यांच्या रकमेचा गोषवारा काढून दाखवला यावेळी संबंधित खात्यावरून ही रक्कम विमा कंपनीच्या खात्यावर गेली असल्याचे दिसत आहे परंतु कंपनी मात्र रक्कम मिळाली नसल्याचे कारण सांगत शेतकर्‍यांना वेठीस धरून पैसे कमावत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या खासगी विमा कंपन्यांना सरकारने जगवण्यासाठी हा खटाटोप चालवला आहे का? आणि पैसे खात्यावरून कपात झाले मग गेले कुठे ? हाच प्रश्न निर्माण झाला आहे.