Breaking News

ऐतिहासिक क्षण

अणुबॉम्ब टाकण्याची भाषा करणारे व सिंगापूर-हनोई येथे पूर्वी झालेल्या दोन बैठका अयशस्वी ठरल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उत्तर कोरियामध्ये जातील, अशी शक्यता कोणीच वर्तवली नव्हती. अगदी ट्रम्प प्रशासनातील मंत्री, अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यातील अधिकारी, पेंटॅगॉन, परराष्ट्रसंबंधांचे विश्‍लेषक यापैकी कोणीही ट्रम्प हे स्वत:हून उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांना भेटायला जातील असा अंदाज व्यक्त केला नव्हता; पण नुकत्याच संपलेल्या जी-20 परिषदेच्या अखेरच्या दिवशी ट्रम्प यांनी एक ट्विट करून उत्तर कोरियामध्ये जाऊन उन यांना भेटणार असल्याचे जाहीर केले आणि सर्वांना धक्का बसला. कारण गेल्या वर्षी सिंगापूरमध्ये व फेब्रुवारीत हनोई येथे दोघांमध्ये झालेली बैठक कोणतीही सहमती न होता पार पडली होती. त्यानंतर उभय देशांमध्ये दुरावा व संशय कायम होता; पण 30 जूनच्या रविवारी असा एक ऐतिहासिक क्षण घडला की जो अविश्‍वसनीय असा होता. ट्रम्प स्वत: 20 पावले चालून दक्षिण कोरियातून उत्तर कोरियात गेले आणि किम यांच्याशी त्यांनी हस्तांदोलन केले. ही घटना जगातल्या सर्वच प्रसारमाध्यमांसाठी औत्सुक्याची ठरली. कारण आजपर्यत अमेरिकेच्या एकाही अध्यक्षाने उत्तर कोरियाच्या भूमीवर पाय ठेवले नव्हते; पण ट्रम्प असे एकमेव अमेरिकेचे अध्यक्ष ठरले, की ज्यांनी उत्तर कोरियात पाऊल टाकून अमेरिका-उत्तर कोरिया संबंधांना कलाटणी दिली. अमेरिकेच्या एकाही अध्यक्षाने उत्तर कोरियाशी जुळवून घेतलेले नव्हते. आंतरराष्ट्रीय राजकारणातही अमेरिकेने उत्तर कोरियाला समज दिली होती; पण धमक्या दिल्या नव्हत्या. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर इराण व उत्तर कोरियाविरोधात राजनैतिक पातळीवर आक्रमकपणे आघाडी उघडली होती. व्हाइट हाउसच्या थिंक टँकला अव्हेरून त्यांची या दोन देशांबाबत कडक, तिरसट भूमिका असे. एका अर्थाने उत्तर कोरियाशी अमेरिकेचे कसे संबंध असावेत, याबाबतचे सर्वाधिकार ट्रम्प यांनी आपल्याकडे ठेवले होते. दीड वर्षांपूर्वी त्यांनी उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला तीव्र हरकत घेत त्यांच्यावर अणुबॉम्ब टाकण्याची भाषा केली होती; पण नंतर काही महिन्यात त्यांच्या भूमिकेत फरक पडून ते सिंगापूरला किम यांची भेट घेण्यास राजी झाले होते. या भेटीतही त्यांचे किम यांच्याशी पटले नाही, म्हणून मध्येच बैठक सोडून गेले होते. सिंगापूर बैठकीनंतर हनोई येथे बैठक झाली; पण त्यातून फार काही साध्य झाले नाही. लागोपाठच्या दोन बैठकीतील अपयशानंतर उभय देशांमधला तणाव कमी होण्यासाठी राजनैतिक पातळीवर झालेल्या प्रयत्नांना यश आले नव्हते.
हा सगळा इतिहास लक्षात घेता उत्तर कोरियात जाण्याचा ट्रम्प यांचा निर्णय त्यांचा स्वत:चा होता हे स्पष्ट दिसते. जी-20 च्या बैठकीत ट्रम्प यांनी अचानक किम यांना उद्देशून ‘वूड यू लाईक मी टू स्टेप क्रास?’ असे एक ट्विट करून किम यांच्याशी हस्तांदोलन करण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. या ट्विटनंतर घडामोडी घडल्या आणि ट्रम्प दक्षिण कोरियाची सीमा ओलांडून उत्तर कोरियात पोहचले व पुढचा इतिहास घडला. ट्रम्प परराष्ट्रसंबंधाबाबत ट्विटमधून काही भाष्य करतात, त्यातून ते अमेरिकेच्या राजनयापेक्षा स्वत:चा एक राजनय आहे, असे सांगत असतात. अशातून ते स्वत:ची शक्तीशाली प्रतिमा तयार करत असतात. प्रतिमांचा हा खेळ या भेटीत दिसला. ट्रम्प यांनी किम यांची भेट घेतली, तेव्हा या दोन्ही नेत्यांची देहबोली सकारात्मक होती. दोघांमधले झालेले हस्तांदोलनही एकमेकांमध्ये कटुता राहिली नसल्याचे निदर्शक होते. ट्रम्प यांनी अगदी सहजतेने किम यांच्या पाठीवर थाप मारली. किम यांच्या भेटीबद्दल त्यांनी धन्यवाद दिले. दोन्ही कोरियांना विभागणारी रेषा आपण पार केली याचा अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले. ट्रम्प यांनी किम यांना व्हाइट हाउसमध्ये येण्याचेही आमंत्रण दिले; पण ही भेट लवकर होणार नसल्याचे नंतर स्पष्ट करण्यात आले. दुसरीकडे किम यांनीही उत्तर कोरियात ट्रम्प यांच्या अचानक येण्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले. ते आल्याने दोन्ही देशांमधील शत्रूत्व मागे पडेल व जगाला या भेटीतून चांगला भविष्यकाळ दिसेल असे उद्गगार त्यांनी काढले. ट्रम्प यांची उत्तर कोरियातील भेट दोन्ही देशांमधील तणाव कमी करणारी असली, तरी 50 मिनिटांच्या चर्चेत उभय देशांनी विधायक कार्यक्रम असा जाहीर केलेला नाही. संयुक्त पत्रकही दोन्ही देशांकडून काढले गेले नाही. एवढ्या सगळ्या घटना घडल्यानंतर अनेक पाश्‍चिमात्य राजकीय विश्‍लेषकांनी ट्रम्प यांची ही भेट म्हणजे राजकीय स्टंट असल्याची टीका केल्याने अमेरिकेची उत्तर कोरियासोबत चांगले संबंध ठेवण्याची खरोखरीच इच्छा आहे का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. अध्यक्षपदावर असताना उत्तर कोरियाची भेट घेणारे ट्रम्प हे पहिलेच अध्यक्ष ठरले आहेत. उत्तर कोरियाने अणुकार्यक्रम थांबवावा, यासाठी अमेरिकेकडून सातत्याने दबाव आणण्यात येतो. यासाठी अमेरिकेने त्यांच्यावर कडक निर्बंधही लादले आहेत. त्यानंतरही उत्तर कोरियाचा अणुकार्यक्रम आणि क्षेपणास्त्र संशोधन सातत्याने सुरू आहे. ट्रम्प आणि किम जोंग यांच्यातील वाक्-युद्धही जोरदार रंगले होते. त्यामुळे, दोन्ही देशांमधील तणाव कायम असून, हा तणाव कमी करण्याच्या दृष्टीने ट्रम्प आणि किम जोंग यांच्यामध्ये चर्चेचे प्रयत्न झाले आहेत. दोन्ही देशांमधील चर्चा पुढील काही आठवड्यांमध्ये पुन्हा सुरू करण्यावर एकमत झाल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली; मात्र उत्तर कोरिया अणुकार्यक्रम थांबविणार का, याविषयीची साशंकता कायम आहे.

ट्रम्प यांनी दक्षिण कोरियातून उत्तर कोरियामध्ये प्रवेश केला आणि शस्त्रसंधी असणार्‍या पानमुनजोम गावातील ’फ्रीडम हाऊस’ या इमारतीमध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीवर ट्रम्प म्हणाले, ’तुम्ही मला सीमारेषा ओलांडायला सांगता आहात, ही सीमा रेषा ओलांडताना मला खूप अभिमान वाटत आहे. जगाच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा दिवस आहे.’  किम जोंग उन यांनीही ट्रम्प यांच्या पुढाकाराचे स्वागत केले. ’दुर्दैवी भूतकाळ विसरून नवे भविष्य खुले करण्याची ही इच्छाशक्ती आहे,’ अशी प्रतिक्रिया किम जोंग यांनी दिली.  ही सीमारेषा दोन्ही कोरियांतील विभागणीचे प्रतीक आहे. या ठिकाणी आपण हस्तांदोलन करत असून, आपण भूतकाळ मागे टाकण्याची इच्छा दाखवत आहोत, हेच यातून दिसत आहे, असे किम जोंग म्हणाले.  ट्रम्प आणि किम जोंग यांच्या भेटीचे राजनैतिक वर्तुळातून स्वागत करण्यात येत आहे. कोरियन युद्धामध्ये दोन्ही बाजू ज्या सीमेवर लढल्या, त्याच ठिकाणी ट्रम्प-किम जोंग यांची भेट होते, ही घटना खूपच महत्त्वाची आहे. या भेटीतून दोन्ही देशांतील चर्चेलाही सुरुवात होऊ शकते. उत्तर कोरिया शस्त्रास्त्रदृष्ट्या सज्ज असला, तरी त्या देशांत गरिबीचे प्रमाण फार आहे. जागतिक निर्बंधाने या देशाची कोंडी झाली आहे. चीन, पाकिस्तान आणि रशियातून पूर्वीसारखी चोरट्या मार्गाने मदत होत नाही. त्यामुळे जास्त काळ जगाशी पंगा घेऊन चालणार नाही, याची जाणीव उन यांना झाली आहे. दोन विक्षिप्त माणसांचे जमते. त्यांच्यात वाटाघाटी होतात, हा जगातला चांगला अनुभव सध्या ट्रम्प व उन यांच्या चर्चेतून येत आहे.