Breaking News

विकासकामांचा पाठपुरवठा ही शिवसेनेची नौटंकी : उपमहापौर

अहमदनगर/ प्रतिनिधी
“नगर शहरात विकासकामे व्हावीत, यासाठी भारतीय जनता पक्षामुळे शहराध्यक्ष व तत्कालीन खासदार दिलीप गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे विशेष मागणी करुन 10 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर करुन आणला. त्यांनी केलेल्या सततच्या पाठपुरवठ्यामुळे शहरातील अंतर्गत विकासासाठी मोठा विकास निधी प्राप्त झाला. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारकडून भुयारी अमृत योजनेंंतर्गत भुयारी गटार योजनासाठी 136 कोटी, पाणीपुरवठा योजनासाठी 100 कोटी, सौरउर्जा  योजनेसाठी 28 कोटी व स्वच्छ भारत अभियानांतर्गत 28 कोटी निधी मंजूर करण्यात यश मिळाले आहे. यापैकी काही कामांची निविदा मंजूर झाल्या असून कामास सुरूवात झाली आहे. असे असताना शिवसेनेचे नेते या विकास कामांबाबत पाठपुरवठा करत असल्याची नौटंकी करत आहेत. 10 कोटी रुपयांच्या विकास निधीतून होणार्‍या कामांचे श्रेय घेण्याचा शिवसेनेला कोणताही अधिकार नाही. नगरची जनता सूज्ञ आहे; कोण विकास निधी आणून प्रत्यक्ष कामे करतात व कोण विकास कामांमध्ये खोडा घालते ते सर्व जनता जाणते. त्यामुळे शिवसेनेने या विकास कामांमध्ये लक्ष घालू नये’’, असे पत्रक उपमहापौर मालन ढोणे यांनी काढले आहे.
उपमहापौर ढोणे पुढे म्हणाल्या, “मागील अडीच वर्षे महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती. सेनेच्या महापौरांच्या काळात केंद्र व राज्य सरकारकडून एक छदामही निधी आणता आला नाही. फक्त विकास होणार.., विकास करणार.., अशा वल्गना केल्या. त्यांच्या काळात  जिल्हाधिकार्‍यांच्या साक्षीने झालेले उड्डाणपूलाच्या मंजुरीसाठी असलेला महत्वाचा ठराव मंजूर केला मात्र सरकारला पाठवताना बदलण्यात आला. शिवसेनेच्या नेत्यांना शहर विकासाचा जर एवढा पुळका आहे तर त्यावेळी असे खालच्या पातळीचे राजकारण का केले? याचे उत्तर जनतेस द्यावे. विकास ही प्रक्रिया असून आपोआप होत असते असे सेनेच्या उपनेते यांचे शहरातील जनतेसाठी कायम गौरवोद्गार आहेत.
माजी खासदार दिलीप गांधी यांनी भाषणापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर अधिक भर दिल्याने हा भरीव विकास निधी मंजूर करुन आणला आहे. नगर शहरातील प्रमुख प्रश्‍न या विकास निधीतून मार्गी लागणार असून, या विकास निधीतून शहरातील रस्ते, गटारी व इतर महत्वाची कामे होणार आहेत. लवकरच सर्व कामांच्या निविदा निघणार असून, प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल. पालकमंत्री राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे, माजी खासदार दिलीप गांधी, महापौर बाबासाहेब वाकळे व सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून शहराचा कायापालट होण्याचे काम आमच्या कार्यकाळात होईलच. जे मंजूर होऊन प्रत्यक्ष सुरु झाली आहेत त्या कामांचा पाठपुरवठा न करता सेनेच्या नेत्यांनी नवीन निधी मंजुरीसाठी आपली ताकद खर्च करावी, असे शेवटी उपमहापौरांनी पत्रकात नमूद केले आहे.