Breaking News

महिलांना न्याय मिळण्यासाठी अंगणवाडीसेवकांची भूमिका महत्त्वाची

अहमदनगर/प्रतिनिधी
“समाजात आजही महिलांवरील अन्याय, हिंसाचाराचे प्रकार चालूच आहेत. अडचणीत आलेल्या महिलांना न्याय मिळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे आवश्यक असते. यात गावपातळीवर अंगणवाडी सेवक तसेच स्थानिक महिला कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. या अंगणवाडी सेवकांनी त्यांच्याकडे आलेल्या प्रकरणाची माहिती दिलासा सेलपर्यंत पोहचवल्यास वेळीच आवश्यक मदत मिळू शकते. कुटुंबातील तंटे, वाद समुपदेशनाने मिटू शकतात. त्या दृष्टीनेही दिलासा सेल प्रयत्न करीत असतो. या उपक्रमाचा लाभ अधिकाधिक पीडीत महिलांनी मिळण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत’’, असे आवाहन जि.प.अध्यक्षा शालिनी विखे यांनी केले.
नगर जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागाच्या वतीने जि.प.सभागृहात कौटुंबिक हिंसाचार या विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष विखे बोलत होत्या. यावेळी अ‍ॅड.निर्मला चौधरी, अ‍ॅड.अनुराधा येवले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम, डॉ.सुनील तुंबारे, नितीन उबाळे, मंगल वराडे, डॉ.वृषाली भिसे आदी उपस्थित होते.
अ‍ॅड.निर्मला चौधरी म्हणाल्या, “कुटुंब वाचवणे ही काळाची गरज आहे. कौटुंबिक हिंसाचारात महिलांना सर्वाधिक त्रास होतो. तिचा आवाज दाबला जातो. या अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम 2005 च्या सुधारित कायद्याने केले आहे. आजच्या काळात महिला अधिक शिक्षित झाल्याने त्या नोकरीसाठी घराबाहेर पडतात. अशावेळी त्यांच्याकडून अधिक अपेक्षा वाढल्याने हिंसाचाराचे प्रकार होतात. अशावेळी महिलांना त्यांच्यासाठी असलेल्या कायद्यांची माहिती असणे व प्रत्यक्ष न्याय मिळणे आवश्यक असते. यासाठी महिलांनी निर्भीडपणे तक्रार देण्यासाठी पुढे यायला हवे. अंगणवाडी सेवकांनी याबाबत माहिती मिळाल्यावर लगेचच त्याची माहिती वरिष्ठ पातळीवर कळवून संबंधित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.’’
अ‍ॅड.येवले म्हणाल्या, “आजच्या काळात महिला सर्वच क्षेत्रात स्वत:ला सिध्द करीत आहेत. असे असले तरी घरामध्ये तिला आजही दुय्यम स्थान आहे. तिची अवहेलना केली जाते. यासाठीच कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधसारखे कायदे अस्तित्वात आले आहेत. या कायद्यामुळे तिला मोठे संरक्षण मिळाले आहे. या कायद्याने तिला तिचे हक्कमिळण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे.’’
प्रास्तविकात संजय कदम यांनी सांगितले की, “महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम 2005 ची माहिती अंगणवाडी सेवकांमार्फत गावपातळीवर महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महिलांना कायद्याने मिळालेल्या अधिकारांची व संरक्षणाची माहिती याद्वारे सर्वांना मिळू शकते. त्या दृष्टीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.’’
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन वीना दिघे यांनी केले. कार्यशाळेस जिल्ह्यातील अंगणवाडी सेवक, पर्यवेक्षिका, मुख्यालयातील महिला अधिकारी, कर्मचारी उपस्थित होत्या.