Breaking News

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनपुरी घाटात दरड कोसळून वाहतूक विस्कळीत

दरड कोसळीची तिसरी घटना ; महामार्ग प्रशासन व वाहतूक पोलिस

संगमनेर/प्रतिनिधी
पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनपुरी घाटात गेल्या सात दिवसात तिसर्‍यांदा दरड कोसळीची मोठी घटना घडली आहे. ही घटना काल शुक्रवार दि.12 रोजी रात्री आकाराच्या सुमारास घडली. सुदैवाने याघटनेत कोणतीही जिवीत किंवा वित्तीय हानी झालेली नाही. डोंगरांवरून पडलेल्या दगडांनी महामार्गावरील एक बाजू संपूर्ण व्यापून टाकल्याने सध्या याठिकणी एकेरी वाहतूक सुरु आहे. आज सकाळपासूनच आषाढी एकादशीला लागून शनिवार रविवारच्या सुट्ट्या आल्याने महामार्गावर प्रवाशी नेहमीपेक्षा जास्त होते. महामार्ग पोलिसांनी जड वाहनांना थांबवत छोट्या वाहनांना वाट मोकळी करण्याचे काम सुरु केले. यावेळी वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी जुन्या चंदनानपुरी घाटातून देखील वाहतूक वळवण्यात आली आहे.
रात्री दरड कोसळल्याची माहिती मिळताच महामार्ग पोलिस, महामार्ग प्रशासन व महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी हजार झाले. महामार्गावर दरड मोठ्या प्रमाणावर पडलेली असल्याने रात्रीतून दरड साफ कारण्याचे काम शक्य नव्हते. त्यामुळे महामार्ग पो.उप.नि. भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रभर पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत वाहतूक वळविण्याचे काम पार पाडले. रविवार दि.7 जुलै रोजी जेंव्हा पहिल्यांदा दरड कोसळलेली त्याचवेळी महामार्ग प्रशासनाने घाटात सुरक्षा जाळी टाकणार्‍या दिल्ली येथील कंपनीला याबाबत कळविले होते. गेल्या दोन दिवसांपासून कंपनीचे अधिकारी घाटातील दरडीचे आणि त्यांनी बसविलेल्या सुरक्षा जाळ्यांचे परीक्षण करायला आलेले आहेत. त्यामुळे रात्री घडलेली घटना या अधिकार्‍यांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरणार आहे. आज सकाळपासूनच जेसीबीच्या साहाय्याने घाटातील दरड काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असून पुढील दोन दिवस हे काम चालणार असल्याचे महामार्ग प्रशासनाने सांगितले आहे.

 वारंवार दरड कोसळण्याचे कारण ?

  • - गेल्या आठवाडाभरात झालेल्या भिज पावसाने घाटाच्या कपारीत पाणी झिरपते
  • - चंदनपुरी घाट संपूर्ण खडक मातीचा असल्याने फोडलेल्या डोंगराची भिंत एकसंघ राहणे कठीण
  • - घाटात सदोष पद्धतीने बसविण्यात आलेल्या सुरक्षा जाळ्या 
  • - महामार्ग निर्माण प्रसंगी मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा केलेला वापर
  • - चंदनपुरी घाटातील भाग वनविभागाच्या अंतर्गत येत असल्यामुळे घाटातील डोगरांवर वनीकरण करण्यात आले आहे.


 चंदनपुरी घाटात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे घाटातील डोंगरावरील काही दगड सुरक्षा जाळ्यांमध्ये लोंबकळत होते. त्यामुळे जाळ्यांवर ताण पडला होता. याबाबत संबंधित कंपनीला कळविण्यात आले. त्यानुसार अधिकारी याठिकाणी परीक्षणकरून नवीन कामाला सुरुवात होणार होती. परंतु रात्री पुन्हा दरड कोसळल्याने काम सुरु करता आले नाही. लवकरच महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात येईल. तसेच भविष्यात सुरक्षा जाळ्यांना दगड लोंबकळल्यास ते ताबडतोब काढून घेतले जातील. 
 - अमित राणा, प्रकल्प व्यवस्थापक, खेड-सिन्नर महामार्ग