Breaking News

प्रेमास नकार दिल्याने प्रियकराची कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या

सांगली / प्रतिनिधी
प्रेयसीने प्रेमास नकार दिल्याने नैराश्य आलेल्या एका तरुणाने तिच्यासमोरच कृष्णा नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते.

अबरार मुलाणी या 24 वर्षीय तरुणाचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. अबरारने या तरुणीला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे असा फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर बाइकवरून तिला कृष्णा नदीवरील स्वामी समर्थ घाटावर नेले. या वेळी त्याने तिच्यावर प्रेम असल्याचे बोलून दाखवत तिच्याशी लग्न करण्याची इच्छाही व्यक्त केली; मात्र तिने आपण मित्र आहोत आणि मित्रच राहू असे त्याला सांगितले. वारंवार सांगूनही त्याने या मुलीकडे प्रेमाचा तगादा लावला. ही तरुणी प्रेमाचा स्वीकार करत नसल्याने संतापलेल्या अबरारने तिच्याकडे मोबाईल आणि दुचाकीची चावी दिली आणि दोन मिनिटात नदीत जाऊन येतो म्हणून तिला सांगितले.

अबरार नदीच्या मध्यभागी गेल्यानंतर या मुलीने आरडाओरड सुरू केली. त्यामुळे नदीत पोहायला आलेल्या लोकांनी त्याच्या दिशेने धाव घेत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत तो बुडाला होता. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल पाच तास शोध घेत त्याचा मृतदेह शोधून काढला. याप्रकरणी या तरुणीची फिर्याद नोंदवून घेण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.