Breaking News

मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारला कोणताही धोका नाही : दिग्विजय सिंह

पुणे / प्रतिनिधी
नोटाबंदीनंतर भाजपकडे मोठ्या प्रमाणात पैसा आला. त्यामुळे कर्नाटक आणि गोवा राज्यात काँग्रेस आमदारांची भाजप खरेदी करीत आहेत. ते चुकीचे आहे; मात्र मध्य प्रदेशातील कमलनाथ यांचे सरकार सुरक्षित आहे. आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे या सरकारला कोणताही धोका नाही. सरकार धोक्यात आल्याच्या केवळ चर्चाच सुरू असतात, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केले. 
दिग्विजय सिंह यांनी पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, वरिष्ठ नेते सदानंद शेट्टी, नगरसेवक अविनाश बागवे, रवींद्र धंगेकर, सुजाता शेट्टी, माजी महापौर कमल व्यवहारे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, अ‍ॅड. अभय छाजेड उपस्थित होते.
या वेळी दिग्विजय सिंह यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ स्वप्न दाखवितात. 2014 च्या निवडणुकीत दोन कोटी रोजगार, काळा पैसा भारतात आणणे, प्रत्येेकाच्या खात्यात 15 लाख अशी अनेक स्वप्न दाखविली होती. नंतर हे केवळ निवडणुकीसाठी जुमले असल्याचे भाजपतर्फे सांगण्यात आले, असे निदर्शनास आणून मी नक्षलवादी असेल तर पोलिसांनी अटक करावी, असे आव्हान त्यांनी दिले. नक्षलवाद्याने पाठविलेल्या पत्रात दिग्विजय सिंह यांच्या मोबाईल नंबरचा समावेश असल्याचे पोलिसांंच्या तपासात उघड झाले होते, त्याबाबत त्यांनी हे वक्तव्य केले. ते बोलत होते. 

देशाची अर्थव्यवस्था बिघडली
नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेचा आकार पाच ट्रिलियन डॉलर होईल, असे स्वप्न दाखविले आहे; पण हे शक्य नाही. देशाची अर्थव्यवस्था बिघडली आहे. बेरोजगारी वाढतच आहे. केंद्र सरकारकडून मात्र चुकीची आकडेवारी प्रसिद्ध केली जात असल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला.

बागवे, जोशी, शेट्टी यांच्यांशी गुप्तगू
पत्रकार परिषद झाल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी रमेश बागवे, मोहन जोशी, सदानंद शेट्टी यांच्याशी बंद केबिनमध्ये गुप्तगू केले. त्यात आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. या पार्श्‍वभूमीवर विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य मित्रपक्षांची आघाडी तसेच काँग्रेसच्या वाट्याला येणार्‍या जागा आणि महाराष्ट्रात काँग्रेससाठीचे वातावरण याची माहिती त्यांनी घेतल्याचे समजते.