Breaking News

लालूप्रसाद यादवांना जामीन मंजूर

पारपत्र न्यायालयात जमा जमा करण्याचे आदेश

रांची
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना रांची उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. देवघर कोषागार प्रकरणात शिक्षेचा अर्धा काळ पूर्ण झाल्यानंतर यादव यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. यावर सुनावणी करताना रांची उच्च न्यायालयाने लालूप्रसाद यांना 50-50 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. त्याचबरोबर यादव यांना पारपत्र जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
चारा घोटाळ्याशी संबंधित देवघर कोषागार प्रकरणात 23 डिसेंबर 2017 ला बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यांना दोषी ठरवले होते. या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालूप्रसाद यांना साडेतीन वर्षाची शिक्षा सुनावली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या कायद्यानुसार, शिक्षेचा अर्धकाळ पूर्ण झाल्यानंतर आरोपीला जामीन दिला जावू शकतो. याच आधारावर लालूप्रसाद यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. इतर दोन प्रकरणात लालूप्रसाद यांना पाच आणि सात वर्षांची शिक्षा झाली आहे.
लालूप्रसाद हे चारा घोटाळ्यातील दुमका, देवघर आणि चाईबासा प्रकरणात शिक्षा भोगत आहे. प्रकृती बिघडली असल्याने त्यांना रिम्सच्या पेइंग वार्डमध्ये दाखल करण्यात आले होते. लालूप्रसाद यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, यकृताचे तसेच किडनीचे विकार आदी विकारांनी ग्रासले आहे.