Breaking News

कर्मवीर काळे उद्योगसमूहाशी ऋणानुबंध असेच ठेवा - काळे

कोपरगाव ता/प्रतिनिधी
 आयुष्याची 30 ते 35 वर्ष सेवा करीत असतांना निवृत्तीच्या वेळी मनाला वाईट वाटणारच, परंतु शासनाच्या नियमानुसार प्रत्येक कर्मचार्‍याला विशिष्ट वयानंतर निवृत्त व्हावेच लागते. नोकरीत असतांना एका चाकोरीत राहून जीवन जगावे लागते. त्यामुळे निवृत्तीनंतर कर्मचार्‍यांनी खचून न जाता स्वत:ला गुंतवून घ्या. कर्मवीर काळे कारखाना व उद्योगसमूहाशी आपला स्नेह व ऋणानुबंध असाच ठेवा असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आ. अशोकराव काळे यांनी केले.
  कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व आसवनी विभागातील एकूण 50 कर्मचार्‍यांचा सेवा निवृत्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी साखर कारखाना 32 व आसवनी विभागातील 18 अशा एकूण 50 कामगारांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
  यावेळी आशुतोष काळे म्हणाले की, 2016 साली कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अनेक निसर्गनिर्मित व राजकीय संकट आली. परंतु सर्व संकटात सभासद, कर्मचारी व सर्वच घटकांनी अतिशय मोलाची साथ दिल्यामुळे सर्व संकटे यशस्वीरीत्या परतावून लावली. परंतु या संकटांची सावली कधीच कामगारांच्या सुखावर पडू दिली नाही. आपण प्रामणिकपणे आपली जबाबदारी पार पाडून निवृत्त होत आहात. त्यामुळे मनाने कधीच निवृत्त होऊ नका.
     याप्रसंगी कारखान्याचे व्हा. चेअरमन सुनील शिंदे, संचालक गिरीश जगताप, जे.ए.भिडे, एस.एस.कोल्हे, बी.बी.सय्यद, डी.बी. चव्हाण, एन.बी.गांगुर्डे, के.व्ही.कापसे, एस.जे.ताकवणे, एस.एस. बोरनारे उपस्थित होते.