Breaking News

विनोद पाटील यांना शिवसेना देणार विधानसभेची उमेदवारी?

मुंबई
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्यासाठी भाजप-शिवसेना युती सरकारने केलेला कायदा मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर, मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर न्यायालयात मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणारे विनोद पाटील यांना शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीदरम्यान औरंगाबाद मतदारसंघातून शिवसेनेला पराभवाचा धक्का मिळाला आहे. तो पराभव पूर्वीचे सेना आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे झाला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू  आहे. इतकेच नाही तर मराठा समाजाची मते जाधव यांनीच फोडली असल्याचे म्हटले जाते. म्हणूनच जाधव यांना शह देण्यासाठी सेनेकडून विनोद पाटील यांना विधानसभेची उमेदवारी मिळू शकते, असा अंदाज आहेत. मराठा आरक्षण मिळवण्यात आणि कोर्टात ती बाजू मांडण्यात पाटील यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. त्यामुळे पाटील मराठा समाजातील मते मिळविण्यात यशस्वी होतील, असे शिवसेनेला वाटते. मराठा आरक्षणाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल या शिष्टमंडळाने ठाकरे यांचे आभार मानले. हायकोर्टाच्या या निकालाला सुप्रीम कोर्टात  आव्हान देण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे या नेत्यांनी  उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर हे आरक्षण देतांना कुणाचाही हक्क हिरावून घेतलेला नसल्याने सर्वोच्च न्यायालयात जाऊ नका. या वादात रमू नका आणि मराठा आरक्षणाला अडसर निर्माण करू नका, असे आवाहन उध्दव यांनी केले. मराठा आरक्षणाला विरोध करून मराठा- मराठेतर असा वाद निर्माण न करता  सर्वांनी छत्रपती शिवरायांचे मावळे बनून एकत्र येऊन एकजूट दाखवावी, असेही उद्धव याप्रसंगी म्हणाले. विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचीही भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले.