Breaking News

फसवणूक झालेल्या युवकाची आत्महत्या

अहमदनगर/प्रतिनिधी
  नोकरीच्या आमिषाने फसवणूक झालेल्या युवकाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील युवकाचा मृतदेह नाशिक जिल्ह्यातील पाचोरा येथे रेल्वे रुळावर आढळून आला. आदिनाथ भिंगारे (वय 21) हे मयत युवकाचे नाव आहे.
  देवळी प्रवरा येथील कारवस्तीतील आदिनाथ हा राहुरी फॅक्टरी येथील धनलक्ष्मी लॉजमध्ये 15 दिवसांपूर्वी तो कामाला लागला होता. जळगाव एमआयडीसीत डीटीपी ऑपरेटरची नोकरी देतो, असे सांगून देवळाली प्रवरा येथील एक युवक त्याला घेऊन गेला. नोकरीला लावण्यासाठी त्याच्याकडून 15 हजार रुपये घेतले. मात्र, तेथे गेल्यावर काहीतरी प्रॉडक्ट विकायचे आणि मेंबर जोडायचे, असे सांगून त्याला वेगळेच काम दिले गेले. फसवणूक झाल्याचे लक्षात आले तेव्हा आदिनाथने आपल्या गावातील आंतरराष्ट्रीय खेळाडू अप्पासाहेब ढूस यांना दूरध्वनी करून सांगितले की, माझी बॅग, पैसे, चप्पल सर्व काही येथील लोकांनी काढून घेतले आहे. ढूस यांनी लगेच देवळालीतून आदिनाथला घेऊन गेलेल्या मित्राशी संपर्क साधला. आदिनाथला फसवू नका, त्याचे पैसे लगेच परत देऊन त्याला गावी पाठवून द्या, असे सांगितले. आदिनाथला धीर देत जसा असेल तसा देवळालीला निघून ये, असे ढूस यांनी सांगितले, पण त्याच्याकडे परत येण्यासाठी पैसे नव्हते. ढूस यांनी जळगाव एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्याशी संपर्क साधला. शिरसाठ यांनी तत्काळ संबंधितांना पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी केली. आदिनाथचे म्हणणे होते की, मला नोकरीचे आमिष दाखवून फसवून जबरदस्तीने पैसे काढून मला डांबून ठेवले. पण त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. केस काढून घे, नाही तर तुला आम्ही जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी कंपनीचे लोक त्याला देत होते. दुसर्‍या दिवशी कंपनीच्या लोकांनी आदिनाथकडून काही कागदांवर जबरदस्तीने सह्या करून घेतल्या. त्यानंतर दोन दिवस आदिनाथचा संपर्क होऊ शकला नाही. शुक्रवारी रेल्वेरुळावर त्याचा मृतदेह आढळला.