Breaking News

चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी निवड समितीचा निर्णय चुकला

बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळे यांची टीका

मुंबई
विश्‍वचषक स्पर्धेत भारतीय संघाची सर्वोत्तम कामगिरी सुरू असतांना, अचानक उपांत्य फेरीत भारतीय फलंदाजी गडगडली. भारतीय संघाची आता समीक्षा होत असून, चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी निवड समितीचा निर्णय चुकल्याची टीका अनेक आजी-माजी खेळाडूंनी केली आहे.
न्यूझीलंडच्या सामन्यात 24 धावांत भारताचे चार फलंदाज बाद झाले होते. आघाडीचे फलंदाज ढेपाळल्यानंतर मधल्या फळीलाही चांगली फलंदाजी करता आली नाही. चौथ्या क्रमांकावर आलेला ऋषभ पंत चांगली फलंदाजी करत असतानाच बेजाबाबदारपणे शॉट खेळून बाद झाला. त्यामुळं भारताची खेळी डगमगली. त्यामुळं वर्ल्ड कपमधली भारताचा चौथ्या क्रमांकाची चिंता पुन्हा एकदा समोर आली. दरम्यान आता बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळे यांनी या सगळ्याचे खापर निवड समितीवर फोडले आहे. जगदाळे यांनी, वर्ल्ड कपसाठी संघाची निवडच चुकली असा आरोप केला आहे. त्यांच्या मते, भारतीय संघाची मधली फळी, दबावाखाली खेळण्यासाठी योग्य नव्हती, त्यामुळं ही जागा अजिंक्य रहाणे हाच योग्य उमेदवार आहे. जगदाळे यांनी निवड समितीवर ताशेरे ओडत, ज्या खेळाडूंना संघात स्थान टिकवता आले नाही, त्यांना संघात जागा का देतात. त्यामुळं रहाणेसारख्या अनुभवी खेळाडूला संघात स्थान द्यायला हवे होते, असे मत व्यक्त केले. वर्ल्ड कपमध्ये ऋषभ पंतला सुरुवातीपासून भारतीय संघात जागा न देण्याबाबतही जगदाळे यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. तसेच, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया दौर्‍यात ऋषभनं कसोटी क्रिकेटमध्ये शतक केले  होते. मग संघात विजय शंकरला का स्थान दिले, असा सवालही त्यांनी निवड समितीला विचारला.


शास्त्री गुरुजींना लवकरच मिळणार नारळ
विश्‍वचषक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघ ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिज दौर्‍यावर जाणार आहे. त्यानंतर शास्त्रींची हकालपट्टी केली जाऊ शकते. कर्णधार विराट कोहली शास्त्रींचे कौतुक करत असले तरी, बीसीसीआयचे अधिकारी मात्र शास्त्रींवर नाराज आहेत.


शास्त्रींनी सांगितले पराभवाचे कारण
शास्त्री यांनी पराभवाचे विश्‍लेषण करतांना म्हटले आहे की, चौथे स्थान हे आमच्यासाठी या वर्ल्ड कपमध्ये चिंतेचा विषय राहिला आहे. सुरुवातीला केएल राहुलला या स्थानावर संधी दिली होती. मात्र, शिखर धवन जखमी झाल्यानंतर राहुलला सलामीसाठी उतरवण्यात आले. त्यानंतर विजय शंकरही जखमी झाला. त्यामुळं चौथ्या क्रमांकाचा प्रश्‍न आमच्यासमोर कायम होता. त्यामुळं आघाडीचे  फलंदाज बाद झाल्यानंतर भारताला मधली फळी सावरू शकली नाही.