Breaking News

लक्ष्मण मानेंचे ‘पवार प्रेम’

काँगे्रसला वंचित बहुजन आघाडीने 40 जागांचा प्रस्ताव दिल्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली. काँगे्रसची चेष्टा केली, असा सूर काँगे्रसमधून उमटत असला, तरी उत्तरप्रदेशात बहुजन समाज पार्टीने अणि समाजवादी पार्टीच्या महाआघाडीने काँगे्रसला लोकसभेच्या केवळ दोन जागांचा प्रस्ताव दिला होता, याचा विसर पडू देऊ नये. तसेच निकालानंतर काँगे्रसची काय अवस्था झाली, उत्तरप्रदेशात किती जागा आल्या. याचा हिशोब टीका करणार्‍यांनी लक्षात ठेवायला हवा. काँगे्रस गलितगात्र झाली आहे, तरी त्यांचा अहंकार अजूनही जातांना दिसून येत नाही. त्याच कळपातील लक्ष्मण माने असल्यामुळे त्यांना शरद पवारांचा कळवळा येणारच. माने यांचे वक्तव्य ते राष्ट्रवादी काँगे्रस सोबत असलेली त्यांची बांधीलकी, आणि नाते स्पष्ट करणारे आहे. त्यांचा बोलविता धनी कोण आहे? हे आता लपून राहीलेले नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी म्हणजे केवळ लक्ष्मण माने नव्हेत.

मोठया महत्तप्रयासाने राज्यातील दलित, ओबीसी, भटका, बारा बलुतेदार समूहाला सोबत घेऊन अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. या काळात विविध घटकांतील नेत्यांनी बाळासाहेबां सोबत येत वंचित आघाडीला बळकटी दिली. वंचित आघाडीच्या नेतृत्वाखाली लढलेल्या लोकसभा निवडणुकांमुळे प्रस्थापित पक्षांना पळता भुई थोडी झाली. वंचित आघाडीला लोकसभेत यश मिळाले नसले, तरी पक्षांचा वाढलेला जनाधार ही वंचितची जमेची बाजू म्हणता येईल. त्याचा फायदा वंचित बहुजन आघाडीला विधानसभेला नक्कीच होईल, यात तिळमात्र शंका नाही. मात्र वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक सदस्य लक्ष्मण माने यांनी थेट बाळासाहेब आंबेडकरांचा राजीनामा मागून, आपण राष्ट्रवादी काँगे्रसच्या कळपातील असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता लक्ष्मण मानेंनी घेतलेली भुमिका ही केवळ राष्ट्रवादी काँगे्रसच्या हिताची आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी शरद पवारासोबत उघड विरोधी भूमिका घेतली होती. शरद पवारांविरोधात बाळासाहेबांची भूमिका लक्ष्मण मानेंच्या दुखावण्यातील मुख्य कारण आहे. कारण लक्ष्मण मानेंची संपूर्ण कारकीर्द केवळ शरद पवाराभोवती गुरफटलेली आहे. मानेंवर अनेकवेळेस गंभीर आरोप झालेत, त्यांना बलात्काराच्या प्रकरणांत काही दिवस तुरूंगात देखील काढावे लागले, अशावेळी लक्ष्मण मानेंचे पालकत्व घेणारे शरद पवार कुठे होते? हा प्रश्‍न अनुत्तरितच राहतो. लक्ष्मण माने यांना यावेळेस कोणत्याही राजकीय पक्षाने जवळ केले नाही. माने यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येते की काय? असा प्रश्‍न निर्माण होत असतांना बाळासाहेब आंबेकरांनी मानेंना सोबत घेऊन दलित, ओबीसी, भटका समुहाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. यामुळे लक्ष्मण मानेंची कारकीर्द सावरायाला मदतच झाली. मात्र मानेंना याचे कसलेही सोयरसुतक नाही. त्यांनी पुन्हा आपले ‘राष्ट्रवादी’ प्रेम दाखवायला सुरूवात केली.
जाणीव असेल ते लक्ष्मण माने कसले. त्यांनी आपले रंग दाखवण्यास सुरूवात केली, ती औरंगादच्या सभेपासूनच. वंचित बहुजन आघाडीच्या औरंगाबाद सभेनंतर माजी. न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांची भूमिका ही वंचित बहुजन आघाडीच्या विरोधातीलच होती. त्यावेळेपासून लक्ष्मण माने देखील वंचित विरोधी भूमिका घेत होते. मात्र ती कुठेही उघड केली नव्हती इतकेच. दुसरे म्हणजे, लक्ष्मण माने वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा देऊन पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँगे्रसच्या कळपात सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर मानेंना राष्ट्रवादी काँगे्रसकडून राज्यसभेच्या उमेदवारीचे गाजर दाखविण्यात आले असल्याच्या चर्चांनी आता जोर धरू लागला आहे. तसेच सत्तेत आल्यानंतर माने यांच्यावर असणारे सर्व खटले बिनशर्थ मागे घेण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँगे्रसकडून आल्यानंतरच माने यांनी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा माने यांचे राजकीय अस्तित्व संपल्यागत जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण राष्ट्रवादी काँगे्रस असो की, काँगे्रस असो, या प्रस्थापित पक्षांनी दलित, ओबीसी, भटका समुहाचा केवळ राजकीय फायद्यासाठी केला. वंचित समुहांसाठी जर या प्रस्थापित समुहाने ठोस भुमिका घेतली असती, तर आज या पक्षांचे पानीपत झाले नसते. माने यांनी बाळासाहेबांच्या विरोधात भुमिका घेऊन देखील बाळासाहेब आंबेडकरांनी अत्यंत संयतपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले आहे की, लक्ष्मण माने हे वंचित बहुजन आघाडीचे नेते असून, ते कायम राहतील. त्यांचा राजीनामा मी स्वीकारणार नाही. बाळासाहेबांच्या या भूमिकेचे नक्कीच स्वागत करायला हवे. कारण बाळासाहेबांचे राजकारण हे नेहमीच वंचित समूहाचे एकत्र आणून, त्यांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बाळासाहेब काँगे्रससोबत आघाडी करण्यास इच्छूक होते. ते देखील काँगे्रसने सन्मानाने जागा दिल्या तर. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वाचा अहगंड आणि संवादाचा अभावामुळे ही आघाडी अस्तित्वात येऊ शकली नाही. त्यात वंचित समुहाला सत्ता मिळाली पाहिजे, याचा लवलेशही नाही. लक्ष्मण मानेंच्या भुमिकेचे तटस्थपणे अवलोकन केले असता, अनेक पैलु समोर येतांना दिसून येत आहे. मुख्य म्हणजे वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत अप्रत्यक्षपणे भाजपला मदत केली. वास्तविक पाहता वंचित बहुजन आघाडीने कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला न बांधता स्वतंत्र अस्तित्व दाखवून दिले. बाळासाहेब आंबेडकरांना जर सत्तेची लालसा असती, तर त्यांना कोणत्या ही राजकीय पक्षासोबत जाऊन केंद्रीय मंत्रिपद पदरात पाडून घेता आले असते. मात्र सत्तेची कोणतीही हाव नसल्यामुळे बाळासाहेबांनी कोणत्याही पक्षाचा मुलाहिजा कधी ठेवला नाही.
राज्यातील वंचित समुहाला सोबत घेऊन, त्यांच्यात सत्ता मिळविण्याचे स्फुल्लिंग चेतवण्याचे काम बाळासाहेब आंबेडकरांनी केले. त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांच्या सभांना तुफान प्रतिसाद मिळतांना दिसून येत आहे. त्यामुळेच प्रस्थापित पक्षांना वंचित बहुजन आघाडीची धडकी भरली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आपल्यासोबत येत नसतील तर त्याची शकले कसे उडतील? यासाठी ज्यांची कारकीर्द गेली, ती ‘पवारनीती’ पुन्हा सक्रिय झाल्याचेच हे चिन्हे आहे. एकाच झेडंयाखाली ज्यावेळी दलित समुहातील सर्वच नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बॅनर खाली एकत्र आली होती. मात्र सत्तेचा तुकडा त्यांच्या समोर फेकुन पक्षाची शकले उडवली. त्यातील फक्त एक-दोघांना मंत्रिपदाची झुळ चढवून अनेक वर्ष दलित मतांचा वापर करण्यात आला. मात्र बाळासाहेब आंबेडकरांनी नेहमीच मंत्रिपदाला, सत्तेला ठोकर मारली. भाजप आज देखील बाळासाहेब आंबेडकरांना राज्यसभेची उमेदवारी राष्ट्रपती कोटयातून द्यायला तयार आहे. मात्र आंबेडकरांनी प्रतिगामी शक्तींचा हा प्रस्ताव ठोकरला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात बहुजन समाजातील अनेक तरूण काम करत आहे. मात्र बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या संघविरोधी भूमिकेमुळे संघाची भूमिका ही केवळ विशिष्ठ समुहांचे हित साधणारी असल्याचे संघातील बहुजन समाजातील तरूणांना कळून चुकले आहे. त्यामुळे असे भरकटलेले तरूण वंचित बहुजन आघाडीत सहभागी होतांना दिसून येत आहे. मग त्यांना आपण स्वीकारायचे नाही, तर कुणी स्वीकारयचे हा महत्वाचा प्रश्‍न उरतोच. वंचितचे महासचिव असलेले गोपीचंद पडळकर हे पूर्वी भाजपमध्ये होते, हे काही लपून राहीलेले नाही. त्यांचे पूर्वी असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले संबध, याची कबुली पडळकर यांनी यापूर्वीच दिली आहे. मात्र संघातील विचारसरणी पटत नाही, म्हणून काही तरूण जर पुन्हा एकदा पुरोगामी चळवळीत सक्रिय होत असतील, तर त्यांना संधी द्यायला नको का? हा प्रश्‍न उरतोच. त्यामुळे माने यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्थ दिसून येत नाहीश त्यात केवळ ‘पवारप्रेम’ दिसून येत आहे.
- बाळकुणाल अहिरे