Breaking News

विधानसभेलाही कुटुंबशाहीच : आपल्याच घरात आमदारकी राहिली पाहिजे असा मानणारी अनेक कुटुंंबे महाराष्ट्रात असून त्यातील सर्वाधिक राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षात!

मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेला एकाच घरातील तिघेजण उभे राहणे योग्य नसल्याचे सांगत नातू पार्थ पवार यांच्यासाठी स्वतःची उमेदवारी मागे घेतली असली तरी विधानसभेला मात्र त्यांचे दुसरे नातू रोहित पवार हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी लढविण्यासाठी इच्छुक आहेत. तशी तयारी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य असलेलेल रोहित यांनी सुरू केली आहे. त्यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे या पक्षातील प्रस्थापित घराण्यांमधील पाहुणे रावळे यांचेच वर्चस्व उमेदवार यादीवर दिसणार हे स्पष्ट आहे.
लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील निकालामुळे दोन्ही काँग्रेसमधील काही आमदार आपले अस्तित्व टिकविण्यासाठी सत्ताधारी भाजप अथवा शिवसेनेच्या आश्रयाला जात आहेत. भाकरी करपू नये म्हणून ती फिरवावी लागते असे सांगत शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत नव्या चेहर्‍यांना अधिक संधी देण्याचे सूतोवाच केले होते. मात्र राष्ट्रवादीतील शक्तिशाली घराण्यांच्या पक्षांतर्गत वर्चस्वापुढे स्वतः पवारांच्या मनातील इच्छेनुसारही फारसे काही होईल, याची शक्यता कमी असल्याचे राष्ट्रवादीतील जाणकारांचे म्हणणे आहे.
पवार यांच्याशी तीन पिढ्यांचे संबंध असलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या बरोरा कुटुंबाने वेगळा मार्ग पत्करला आहे. बरोरा यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुळातच राष्ट्रवादीमध्ये अनेक प्रस्थापित घराणी आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, राजेश टोपे, खा. सुनील तटकरे, माजी मंत्री मधुकरराव पिचड, अहमदनगरचे जगताप कुटुंब, नाशिक भागातील हिरे परिवार, माजी मंत्री अनिल देशमुख, गणेश नाईक अशा नेत्यांच्या कुटुंबातील एकापेक्षा अधिक व्यक्ती विधानसभेसाठी इच्छुक आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपल्याच घरात आमदारकी राहिली पाहिजे असा मानणारी अनेक कुटुंंबे महाराष्ट्रात असून त्यातील सर्वाधिक राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षात आहेत.
मोदींचा झंझावात येण्यामागे वर्षानुवर्षांच्या त्याच घराण्यांच्या सत्तेला कांळलेले नागरिक हेदेखील प्रमुख कारण असल्याचे अनेक राजकीय तज्ज्ञ सांगत असले तरीही या घराण्यांच्या दबदब्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षातील नेत्यांचे काहीही चालत नसल्याचेच चित्र आहे. रोहित यांना कर्जत जामखेडमध्ये तिकीट मिळणार असेल तर तोच न्याय इतर प्रस्थापित घराण्यांनाही लावणे क्रमप्राप्त असेल. त्यामुळे राष्ट्रवादीत नात्यागोत्यांचे राजकारण सांभाळणे हाच एकमेव निवडून येण्याच्या मेरिटचा अंगभूत गुण ठरण्याची शक्यता असल्याची चर्चा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.