Breaking News

मुस्लीम बांधवांकडून राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी
   देशभरात मॉब लिंचींग प्रकरणामध्ये मारहाण होऊन मयत झालेल्या लोकांना न्याय द्यावा, अशा घटना घडू नये, यासाठी मुस्लीम बांधवांकडून राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
 राहुरी येथे जमियत ए-उल्मा-ए हिंद व एमआयएमच्या वतीने  मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी विविध बहुजन संघटनांनी मोर्चास पाठींबा दिला. झारखंड राज्यात नुकतेच तबरेज अन्सारी नामक व्यक्तीला काही गुंड प्रवृत्तीच्या जमावाने एकत्र येत मारहाण केली. धार्मिक घोषणा करण्यासाठी दबाव निर्माण केला. यामध्ये संबंधित तरूणाचा मृत्यु झाला. अशा घटना देशात दैनंदिन घडतच असून देशाची एकात्मता धोक्यात येण्याची शक्यता आहे. देशात दुफळी निर्माण करण्याच्या उद्देशाने काही गुंडप्रवृत्तीचे लोक असे कृत्य करीत असल्याने शासनाने याबाबत कडक कायदा करावा, अशी मागणी मुस्लीम बांधवांनी मोर्चाद्वारे नायब तहसीलदार गणेश तळेकर यांच्याकडे केली.
 तसेच कर्जत येथील तौसिफ शेख यांच्या आत्मदहनाबाबत शासनाने न्याय देण्याची मागणी करण्यात आली. मुस्लीम समाजाला अ‍ॅट्रासिटी सारखा कायदा लागू करण्यात यावा, आदी मागण्या निवेदनाद्वारे शासनाकडे करण्यात आल्या आहेत.
 यावेळी मौलाना मुफ्ती अल्ताफ, मौलाना अस्लम, एमआयएमचे इम्रान देशमुख, मौलाना अनिस अन्सारी, महेमुद देशमुख, डॉ. जालिंदर घिगे, बिलाल शेख, इम्रान सय्यद, मुज्जूभाई कादरी, इमदाद पठाण, मौलाना बशिर, अमजत पठाण व आदी उपस्थित होते.