Breaking News

नगरसेवकांचा प्रशासनावर दणदणीत विजय

अहमदनगर/प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘नगरसेवक विरूध्द प्रशासन’ सामन्यात नगरसेवक संघाने प्रशासनावर 32 धावांनी दणदणीत विजय मिळवला. सर्वाधिक धावा काढणार्‍या महापौर बाबासाहेब वाकळे (38 धावा) यांना ‘सामनावीर’ घोषित करण्यात आले.
नगरसेवक संघाने प्रथम फलंदाजी करत 10 षटकांमध्ये 2 विकेट्स गमावून 103 धावांचा डोंगर उभा केला. यात महापौर वाकळे यांनी सर्वाधिक 38 धावा काढल्या. तसेच नगरसेवक मनोज कोतकर यांनी नाबाद 21 व राहुल कांबळे यांनी नाबाद 15 धावा काढल्या. शशिकांत नजण यांनी महापौरांची विकेट घेतली. राहुल कांबळे यांनी सलग दोन षटकार ठोकून सामन्यात रंगत आणली.
अधिकारी संघासमोर विजयासाठी 104 धावांचे आव्हान होते. मात्र त्यांना 10 षटकांत केवळ 71 धावांपर्यंतच मजल मारता आली. अधिकारी संघातर्फे व्हिन्सेंट फिलिप्स यांनी दोन चौकार व एक षटकार ठोकत सर्वाधिक 25 धावा केल्या.
सामन्यानंतर महापौर बाबासाहेब वाकळे व आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. आयुक्तांच्या हस्ते विजेत्या नगरसेवक संघाला ट्रॉफी देण्यात आली तर उपविजेत्या अधिकारी संघालाही महापौरांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात आली. सामनावीर म्हणून महापौर वाकळे यांना गौरविण्यात आले तर उत्कृष्ट फलंदाजीसाठी व्हिन्सेंट फिलिप्स व उत्कृष्ट गोलंदाजीसाठी श्याम नळकांडे यांना गौरविण्यात आले.
दरम्यान महापौर वाकळे, नगरसेवक कोतकर, कांबळे व नळकांडे वगळता उर्वरीत नगरसेवकांनी सामन्याकडे पाठ फिरविली. महापौर कार्यालयातील कर्मचार्‍यांनी नगरसेवक संघाच्या वतीने खेळून नगरसेवकांची उणीव भरुन काढली. अधिकार्‍यांच्या वतीने आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपायुक्त सुनील पवार, प्रदीप पठारे, आरोग्याधिकारी अनिल बोरगे, अभियंता परिमल निकम, प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर, मुख्य स्वच्छता निरीक्षक अन्वर शेख, प्रसिद्धी अधिकारी मिलिंद वैद्य, क्रीडा विभागाचे रामदास ढमाले यांनी सहभाग घेऊन उपस्थिती दर्शविली.