Breaking News

राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम

हवामान खात्याचा इशारा

मुंबई
मुंबईसह राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सोमवारी मुंबईमध्ये झालेल्या जोरदार पावसाने मुंबईकरांची चांगलीच दैना केली. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे विदर्भासह मध्य भारतातील अनेक राज्यांत पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.  कोकण आणि गोवा याठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
2 जुलैला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस होणार आहे. तर 3 जुलैला कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 4 जुलैलै कोकण, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईसह राज्यात काही दिवसांपूर्वी दाखल झालेल्या मान्सूननंतर मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून वरुणराजाचे जोरदार आगमन झाले होते. त्यानंतर हवामान खात्याने देखील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यानंतर सोमवार सकाळपासून पावसाला सुरुवात झाल्याचे पहायला मिळाले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरावर ईशान्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी येत्या दोन दिवसांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे लवकरच मान्सून पुढे मध्य भारतात आणि त्यानंतर राजस्थानमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. तर आगामी दोन दिवसांत मुंबईसह ठाणे आणि पालघरमधील काही ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये रेड अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्गातही मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा काही ठिकाणी अनुभव येण्याची शक्यता आहे. कोल्हापूर आणि सातार्‍यात रविवार, मंगळवार आणि बुधवार या तीनही दिवशी घाट परिसरामध्ये मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.