Breaking News

आसाममध्ये पुराचा साडेचार लाख लोकांना फटका

गुवाहाटी
आसाममध्ये पुराने थैमान घातल्याने तब्बल साडेचार लाख लोकांना फटका बसला आहे. आसाममधील 17 जिल्ह्यांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. अनेक जिल्ह्यांमधील नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहू लागल्या आहेत. 

आसामच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार गोलाघाट, धेमाजी आणि कामरुपमध्ये तीन जणांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे. या तीन जिल्ह्यांबरोबरच लखीमपूर, बिस्वानाथ,दरँग, बारपेटा, नलबारी, चिरांग, गोलाघाट, मजुली, जोरहाट, दिब्रुगड, नागाव, मोरीगाव, कोक्राझार, बोंगाईगाव, बकसा आणि सोनीतपूर जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. बारपेटा जिल्ह्याला पुराचा सर्वांधिक फटका बसला आहे. या जिल्ह्यातील 82 हजार  262 लोकांना फटका बसला आहे. धेमजीमध्येही जवळपास तशीच परिस्थिती असून 80 हजार 219 लोक प्रभावित झाले आहेत.

मुसळधार पावसामुळे आतापर्यंत  749 खेडी तसेच 41 महसूल विभाग पाण्याखाली गेले आहेत. जवळपास दोन हजार लोकांची छावण्यांमध्ये सोय करण्यात आली आहे. काझीरंगा राष्ट्रीय पार्कमध्येही पाणी घुसल्याने प्राण्यांची अवस्था बिकट झाली आहे.