Breaking News

भाजपच्या माजी खासदाराला खूनप्रकरणी जन्मठेप

अहमदाबाद
माहिती अधिकार कार्यकर्ते अमित जेठवा यांच्या हत्येप्रकरणी भाजपचा माजी खासदार दीनू बोघा सोलंकी याच्यासह सातजणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याशिवाय दीनू सोलंकी आणि त्याचा भाचा शिवा सोलंकी या दोघांना प्रत्येकी 15 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. अहमदाबादच्या सीबीआय कोर्टाने हा निकाल दिला. यापूर्वी शनिवारी कोर्टाने सोलंकी यांच्यासहीत सातही आरोपींना हत्या आणि षडयंत्र रचल्याप्रकरणी दोषी ठरवले होतं.

20 जुलै 2010 रोजी गुजरात उच्च न्यायालयाच्या समोरच अमित जेठवा यांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी गुजरात पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने सोलंकीला क्लिन चीट दिली होती. त्यामुळे जेठवा यांच्या वडिलांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले होते. सीबीआय चौकशीत सोलंकीसहीत सातही आरोपी दोषी आढळले होते. गीरच्या जंगलातील अवैध उत्खननप्रकरणी जेठवा यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मिळवण्यासाठी अनेक अर्ज टाकले होते. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली होती. दीनू सोलंकी हे 2009 ते 2014 दरम्यान जुनागडमधून भाजपचे खासदार म्हणून निवडून आले होते.