Breaking News

राजीनाम्याच्या निर्णयावर राहुल ठाम

नवीदिल्ली
काँग्रेस अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचे राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी विनंती करूनदेखील राहुल यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे. गेहलोत यांनी ट्विट करत सध्याच्या परिस्थितीत राहुल हेच पक्षाचे नेतृत्त्व करण्यात सक्षम असल्याचे म्हटले होते.

‘सध्या जी परिस्थिती आहे ती पाहता फक्त राहुल गांधीच पक्षाचे नेृत्तत्व करू शकतात, असे आम्हाला वाटते. देशाच्या भल्याकरिता तसेच देशवासीयांसाठी असणार्‍या त्यांच्या बांधिलकीची तुलना होऊ शकत नाही’, असे गेहलोत यांनी म्हटले होते. गेहलोत यांच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देताना राहुल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, की मी माझा निर्णय घेतला आणि तुम्हा सर्वांना त्याची माहिती आहे. काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री भेट घेण्याच्या काही वेळ आधी राहुल यांनी हे वक्तव्य केले. राहुल यांची भविष्यात नेमकी काय भूमिका असणार आहे यावरून व्यक्त होणारे तर्क-वितर्क तसेच यावरून सुरू असलेल्या राजीनाम्याचे सत्र याच पार्श्‍वभुमीवर ही बैठक होणार आहे.
राहुल यांच्यासोबत होणार्‍या बैठकीआधी बोलताना गेहलोत यांनी राहुल गांधीच काँग्रेसचे नेतृत्त्व करू शकतात असे वक्तव्य केले आहे. राहुल यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव सादर केल्यापासून पहिल्यांदाच काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
गेहलोत यांनी सांगितले होते, की काँग्रेसशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री राहुल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. याआधीही आम्ही सर्व मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी आम्हा सर्वांची असल्याचे सांगितले होते.