Breaking News

कर्नाटकात काँग्रेसला आणखी एक धक्का

आमदाराचा राजीनामा; सरकार संकटात

बंगळूर
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस धर्मनिरपेक्ष  जनता दलात उलथापालथ सुरूच आहे. याच दरम्यान काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसचे विजयनगर येथील आमदार आनंद सिंह यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आपण आमदारकीचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी स्वतः स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडी सरकार पुन्हा संकटात येण्याची शक्यता आहे.
भाजपने ज्या वेळी ऑपरेशन कमळ राबविले होते, त्या वेळी काँग्रेसने आपल्या आमदारांना कर्नाटकातील इगलटन रिसॉर्टमध्ये ठेवले होते. तेथे काँग्रेस आमदार आनंद सिंह यांच्या डोक्यात काँग्रेसचे कंपली (जि. बळ्ळारी) येथील  आमदार जे. एन. गणेश यांनी बाटली फोडून मारहाण केली होती. आता आनंद सिंह यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी अमेरिकेत आहेत. त्यांच्या माघारी राज्यात राजकीय हालचाली वेगाने सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर कुमारस्वामी यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप पुन्हा एकदा आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये 228 सदस्यसंख्या असलेल्या सभागृहात 105 जागा जिंकून पहिल्या स्थानी आलेल्या भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसनेधर्ण निरपेक्ष जनता दलाशी आघाडी करून सरकार स्थापन केले; पण पहिल्या दिवसापासूनच आघाडीमध्ये कुरबुरी आणि मतभेदांचे सुरू आहे. दरम्यान, आतापर्यंत काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामे दिले आहेत. याआधी उमेश जाधव यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता तीन महिन्यांच्या आत आमदार आनंद सिंह यांनीही राजीनामा दिला आहे. ते ही भाजपत प्रवेश करण्याची शक्यता आहे.